पूस काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:00 IST2020-08-18T05:00:00+5:302020-08-18T05:00:24+5:30

शहरवासीयांची तहान भागविणारे पूस धरण पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहे. तूर्तास धरणात ९६.६९ टक्के पाणीसाठा झाला आहे. शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासात ४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा आजपर्यंत ६०१.०८ मिमी पाऊस कोसळला आहे.

Warning to the villages on the banks of Pus | पूस काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

पूस काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

ठळक मुद्देधरण ‘ओव्हर फ्लो’ : १०० टक्के पाणीसाठा, पूस नदीला आला दुथडी पूर

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : पुसदकरांची तहान भागविणारे पूस धरण ९६.६९ टक्के भरले आहे. धरण कोणत्याही क्षणी पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शहरवासीयांची तहान भागविणारे पूस धरण पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहे. तूर्तास धरणात ९६.६९ टक्के पाणीसाठा झाला आहे. शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासात ४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा आजपर्यंत ६०१.०८ मिमी पाऊस कोसळला आहे. गेल्या वर्षी १७ ऑगस्टला धरणात केवळ ३९.६९ टक्के जलसाठा होता. त्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.
पूस धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने पूस नदीला पूर येण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदी काठावरील चिखली (कॅम्प), वनवार्ला, बान्शी, येरंडा, सावंगी, रंभा, पिंपळगाव (शेलू), कोप्रा (भोजला) आदी गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच ही नदी शहरातून वाहत असल्याने नदी काठावरील शहरवासीयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पूस धरण कधीही ओव्हर फ्लो झाल्यास नदीला पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील नदी काठावरील नागरिकांनी आपली निवासस्थाने काढून घ्यावी, जीवित वित्त हानी टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, नदीलगतची घरे सूचना मिळताच खाली करावी. अन्यथा कोणतीही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे मुख्याधिकारी डॉ.किरण सुकलवाड यांनी स्पष्ट केले.

पुसद तालुक्यातील जनजीवन विस्कळीत
गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र पूस धरणात पाणीसाठा वाढल्याने नदी काठावरील गावांमधील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तसेच पुसदवासीयांमध्येही धरण भरल्याने समाधान आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने शहरवासीयांना सूर्यदर्शनसुद्धा झाले नाही.

Web Title: Warning to the villages on the banks of Pus

टॅग्स :Rainपाऊस