विद्यार्थी घेतात उघड्यावर शिक्षण

By Admin | Updated: September 18, 2014 00:09 IST2014-09-18T00:09:07+5:302014-09-18T00:09:07+5:30

आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करीत असताना महागाव तालुक्यातील शिरपूर येथील विद्यार्थ्यांना मात्र उघड्यावर बसून अभ्यासाचे धडे

Students take the open education | विद्यार्थी घेतात उघड्यावर शिक्षण

विद्यार्थी घेतात उघड्यावर शिक्षण

महागाव : आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करीत असताना महागाव तालुक्यातील शिरपूर येथील विद्यार्थ्यांना मात्र उघड्यावर बसून अभ्यासाचे धडे गिरवावे लागत आहे. पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत वर्गखोल्या मात्र चारच आहे. त्यामुळे चार वर्ग कधी झाडाखाली तर कधी वऱ्हांड्यात भरविल्या जातात. पाऊस आला तर एकाच खोलीत दोन-दोन वर्ग भरविण्याची वेळ शिक्षकांवर येते.
पुसद-माहूर मार्गावर शिरपूर येथे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळा आहे. पहिली ते आठवीपर्यंत २१५ विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. या शाळेसाठी पूर्वी सहा खोल्या होत्या. परंतु दीड वर्षांपूर्वी दोन खोल्या पडल्या. त्यामुळे चारच वर्गखोल्यात विद्यार्थ्यांना बसावे लागते. मात्र पहिली ते आठवीचे आठ वर्ग चार खोल्यात बसविणे शक्य नसल्याने काही वर्ग वऱ्हांड्यात तर काही वर्ग शाळेच्या आवारात भरविले जातात. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना खिचडीसुद्धा उघड्यावरच बसून खावी लागते. पावसाळ्यात तर मोठी कसरत करावी लागते.
पाऊस आला की एका खोलीत दोन-दोन वर्ग भरविले जातात. या प्रकाराने विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान होत आहे.
वर्ग खोल्यांसाठी शाळेने वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे सरपंचासह गावकऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. छायाचित्रासह त्यांना दुरावस्थेची माहिती दिली. परंतु अद्यापही वर्गखोल्यांचे भिजत घोंगडे कायम आहे. अशा स्थितीत पालक आपल्या मुलांना बाहेरगावच्या शाळेत टाकण्याच्या तयारीत आहेत.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Students take the open education