शकुंतलेची रसद संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2015 02:59 IST2015-08-25T02:59:34+5:302015-08-25T02:59:34+5:30

यवतमाळचे वैभव असलेल्या शकुंतलेची आर्थिक तरतूद संपुष्टात आली आहे. अशातच शकुंतला गत २०

Shakuntala's logistics was over | शकुंतलेची रसद संपली

शकुंतलेची रसद संपली

अनिश्चित काळासाठी बंद : स्टेशनमास्तरला अमरावतीत हलविले
यवतमाळ : यवतमाळचे वैभव असलेल्या शकुंतलेची आर्थिक तरतूद संपुष्टात आली आहे. अशातच शकुंतला गत २० दिवसांपासून यवतमाळकडे फिरकली नाही. कधी येणार हेही निश्चित नाही. ही ट्रेन अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली, असे सूचना फलकच रेल्वेस्थानकावर लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यवतमाळच्या रेल्वेस्टेशन निरीक्षकांना अमरावतीला हलविण्यात आले आहे. यामुळे शकुंतलेच्या अनिश्चिततेचे सावट अधिकच गडद झाले आहे.
शतकापूर्वी ब्रिटिशांनी यवतमाळात शकुंतला सुरू केली. ही रेल्वे २०१६ पर्यंत निक्सन कंपनीच्या ताब्यात आहे. एक वर्षानंतर तिचा करार संपुष्टात येणार आहे. आतापर्यंत शकुंतलेचे मेंटनेन्स हे शकुंतलेच्याच उत्पन्नावर सुरू होते. आता शकुंतलेचे उत्पन्नच संपुष्टात आले आहे. यामुळे ब्रिटिश कंपनीला ही रेल्वे चालविणे अवघड झाले आहे.
ही रेल्वे स्वत:च्या मालकीची नसल्याने केंद्रानेही तिच्यासाठी तरतूद केली नाही. परिणामी ‘गरीबरथ’ थांबला आहे.
साधारणत: वर्षभरापूर्वी आर्थिक तरतुदीअभावी ही रेल्वे बंद पडली होती. यानंतर राजकीय पातळीवर हालचाली झाल्या आणि शकुंतला सुरू झाली होती. ६ आॅगस्टपासून रेल्वे प्रशासनाने ही गाडी पुन्हा बंद केली आहे. आज २० दिवस झाले तरी ती पुन्हा सुरू झाली नाही. विशेष म्हणजे, या रेल्वेस्टेशनचे मास्टर निमकर यांच्यावर अमरावतीचा भार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे मास्टरचे पदही डळमळीत झाले आहे. दुसरीकडे शकुंतला न आल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. शकुंतला सुरू होणार किंवा नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. (शहर वार्ताहर)

४आधीच उपेक्षा भोगणाऱ्या शकुंतला रेल्वेकडे प्रशासनाकडूनही दुर्लक्ष होत आहे. निक्सन कंपनीसोबतचा करार देखील आता संपण्याच्या बेतात आलेला आहे. मात्र त्यापूर्वीच उत्पन्नाचा स्रोत आटल्याने करार संपण्यापूर्वीच शकुंतलाची चाके थांबली आहे.

गतवर्षी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. या रेल्वेचे ब्रॉडगेज करण्याचा प्रस्ताव आहे. त्यावर निर्णय होण्याची आशा आहे. यामुळे यवतमाळला फायदा होईल. शकुंतला रेल्वे पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू.
- भावना गवळी
खासदार, यवतमाळ

Web Title: Shakuntala's logistics was over