यवतमाळातही कोरोना रुग्णांवर ‘प्लाझ्मा थेरपी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 05:00 AM2020-07-02T05:00:00+5:302020-07-02T05:00:07+5:30

मुंबईतील रुग्णालयामध्ये अतिशय गंभीर अवस्थेत असलेल्या कोरोना रुग्णांना वाचविण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. दिल्ली सरकारनेही प्लाझ्मा थेरपीला मान्यता दिली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (एम्स) संस्था दिल्ली येथील तज्ज्ञांनीही प्लाझ्मा थेरपीला दुजोरा दिला आहे. त्यादृष्टीने यवतमाळ मेडिकलच्या डॉक्टरांनी तशी तयारी सुरू केली आहे.

Plasma therapy on corona patients in Yavatmal too | यवतमाळातही कोरोना रुग्णांवर ‘प्लाझ्मा थेरपी’

यवतमाळातही कोरोना रुग्णांवर ‘प्लाझ्मा थेरपी’

Next
ठळक मुद्देडॉक्टरांची तयारी : निगेटिव्ह झालेल्या व्यक्तीच्या रक्ताचा उपयोग

सुरेंद्र राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना रुग्णाला बरे करण्यासाठी विविध औषधी व उपचारपध्दती अवलंबिल्या जात आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांना प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्याचे निर्देश दिले. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने यासाठी तयारी केली आहे. गरज पडल्यास कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरपी वापरली जाणार आहे.
मुंबईतील रुग्णालयामध्ये अतिशय गंभीर अवस्थेत असलेल्या कोरोना रुग्णांना वाचविण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. दिल्ली सरकारनेही प्लाझ्मा थेरपीला मान्यता दिली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (एम्स) संस्था दिल्ली येथील तज्ज्ञांनीही प्लाझ्मा थेरपीला दुजोरा दिला आहे. त्यादृष्टीने यवतमाळ मेडिकलच्या डॉक्टरांनी तशी तयारी सुरू केली आहे. कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर त्यातून पूर्णपणे निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या रक्ताचा उपयोग केला जातो. निगेटिव्ह रिपोर्ट आल्यापासून २८ दिवस कालावधी पूर्ण झाला व या काळात त्या व्यक्तीला कोविडसह इतर कुठल्याही आजाराची लक्षणे नाही, अशाच व्यक्तीचे रक्त प्लाझ्मासाठी वापरले जाते.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या चमूने अशा तीन जणांची निवड केली. मात्र त्यातील दोघांमध्ये इतर काही किरकोळ आजाराची लक्षणे असल्याने शिवाय त्यातील एकाचे वय ५५ वर्षेपेक्षा अधिक असल्याने त्यांचे रक्त प्लाझ्मासाठी वापरणे टाळले. एकाच्या रक्ताचा वापर प्लाझ्मासाठी केला जाणार आहे. तूर्त एक बॅगपासून प्लाझ्मा वेगळा करून तो ठेवण्यात येणार आहे. गरज पडल्यास आयसोलेशन वॉर्डातील कोरोनाबाधीत रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्याची तयारी करण्यात आली आहे.

नवीन मशीन खरेदीचा प्रस्ताव
मेडिकलच्या कोरोना चाचणी लॅबमध्ये २४ तासात दीडशे नमुन्यांची तपासणी होते. ही क्षमता आणखी वाढविण्यासाठी नवीन मशीन खरेदीचा प्रस्ताव आहे. यात ऑटोमॅटिक न्यूक्लीक अ‍ॅसीड एक्स्ट्रेशन मशीन व आरटीपीसीआर मशीन असे दोन पर्याय ठेवले आहेत. आता सध्या यवतमाळ व वाशिम या दोन जिल्ह्यातील नमुन्यांची तपासणी केली जाते. बुधवारपासून बुलडाणा जिल्ह्यातील नमुन्यांची तपासणी यवतमाळात करण्यात येणार आहे.

प्लाझ्मा थेरपीचा वापर करून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. योग्य व्यक्तीचे रक्त घेऊन प्लाझ्मा संग्रही ठेवला जात आहे.
- डॉ.मिलिंद कांबळे,
कोरोना समन्वयक
वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ

Web Title: Plasma therapy on corona patients in Yavatmal too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.