विरोधी पक्ष नेत्यांचा जिल्हा प्रशासनाला ‘गुड रिमार्क’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:00 IST2020-08-20T05:00:00+5:302020-08-20T05:00:44+5:30

आयसीएमआरच्या निर्देशानुसार कोरोना संसर्गाचे प्रमाण पाच ते दहा टक्केच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. पाच टक्के प्रमाण आयडल मानले जाते. यवतमाळ जिल्ह्यात संसर्गाचे प्रमाण ७.९ टक्के आहे. तर येथील मृत्यू दर हा २.५ टक्के इतका आहे. तो खूप जास्त नसला तरी प्रशासनाने खाली आणण्याचा प्रयत्न करावा अशी सूचना केली.

Opposition leaders give 'good remarks' to district administration | विरोधी पक्ष नेत्यांचा जिल्हा प्रशासनाला ‘गुड रिमार्क’

विरोधी पक्ष नेत्यांचा जिल्हा प्रशासनाला ‘गुड रिमार्क’

ठळक मुद्देजिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात : मात्र दक्षतेच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होता, आता स्थिती नियंत्रणात दिसत आहे. मात्र येत्या दीड महिन्यांत जिल्ह्यातील यंत्रणेने अधिक दक्ष राहण्याची गरज आहे, अशी सूचना राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. जिल्हा प्रशासनाच्या कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजनेबाबत समाधान व्यक्त करीत ‘गुड रिमार्क’ दिला. बुधवारी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी ३.३० वाजता वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अभ्यागत कक्षात प्रमुख अधिकाऱ्यांची भाजप आमदारांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील संसर्गाचे प्रमाण, कोरोनामुळे होणार मृत्यू दर या सर्वांचा सखोल आढावा घेतला. या बैठकीला आमदार मदन येरावार, आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार डॉ. संदीप धुर्वे, आमदार नामदेव ससाने, आमदार अ‍ॅड. नीलय नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, सुमित बाजोरिया, प्रा.डॉ. प्रवीण प्रजापती, नगरसेवक विजय खडसे, मनीष दुबे, दिनकर पावडे, अ‍ॅड. प्रफुल्ल चव्हाण आदी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अधिष्ठाता डॉ. राजेश सिंग, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण आदी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण किती याचाही आढावा घेतला. त्यानंतर जिल्हा नियोजन सभागृहात पुन्हा बैठक घेतली.
आणखी तपासण्या वाढविण्याची गरज आहे. पुढील दीड महिना यंत्रणेने अधिक सजग असण्याची गरज आहे. जिल्ह्यात ऑक्सीजन सुविधा असलेले अतिरिक्त बेड तयार आहेत. मात्र मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या शहरातील अनुभव लक्षात घेता जिल्ह्यातील यंत्रणेने कोरोनाच्या उपाययोजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी कोरोना वार्डातील समस्यांबाबत निगेटिव्ह झालेल्या अमोल व्हडगिरे यांनी विरोधी पक्ष नेत्यांना निवेदन दिले.

मृत्यूदर जास्त नाही, पण कमी करण्याचा प्रयत्न करा
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या आकडेवारीसह माहिती दिली. आयसीएमआरच्या निर्देशानुसार कोरोना संसर्गाचे प्रमाण पाच ते दहा टक्केच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. पाच टक्के प्रमाण आयडल मानले जाते. यवतमाळ जिल्ह्यात संसर्गाचे प्रमाण ७.९ टक्के आहे. तर येथील मृत्यू दर हा २.५ टक्के इतका आहे. तो खूप जास्त नसला तरी प्रशासनाने खाली आणण्याचा प्रयत्न करावा अशी सूचना केली.

Web Title: Opposition leaders give 'good remarks' to district administration