वणी, मारेगाव परिसरात मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 05:00 AM2020-08-04T05:00:00+5:302020-08-04T05:00:15+5:30
वणीतून वाहणारी निर्गुडा नदीदेखील दुथडी भरून वाहत होती. सोमवारीदेखील वणी परिसरात ढगाळ वातावरण होते. गेल्या काही दिवसांपासून तिव्र उन्हाची अनुभूती घेणाऱ्या वणीकरांना रविवारच्या पावसाने दिलासा दिला. या पावसाचा सर्वाधिक फटका मारेगाव तालुक्याला बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी/मारेगाव : रविवारी रात्री वणीसह मारेगाव तालुक्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. गेले काही दिवस बेपत्ता असलेल्या पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांसह सामान्य माणुसही सुखावला आहे.
गेल्या २४ तासांत वणी तालुक्यात ५६ मि.मी. तर मारेगाव तालुक्यात २८.२ मि.मी. पावसाची नोंद झालबमुसळधार पावसामुळे वणी तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला. वणीतून वाहणारी निर्गुडा नदीदेखील दुथडी भरून वाहत होती. सोमवारीदेखील वणी परिसरात ढगाळ वातावरण होते. गेल्या काही दिवसांपासून तिव्र उन्हाची अनुभूती घेणाऱ्या वणीकरांना रविवारच्या पावसाने दिलासा दिला.
या पावसाचा सर्वाधिक फटका मारेगाव तालुक्याला बसला.
रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास जोरदार अतिवृष्टी झाल्याने शेतात पाणी शिरून पिके खरवडून नेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी घरे कोसळली. मारेगाव शहरातील सकल भागात घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. काल पडलेल्या अतिवृष्टी पावसाने शहरातील प्रभाग १० व ४ मधील नाल्या तुडूंब भरून नाल्यातील दूषित पाणी धो-धो वाहत चक्क घरात शिरले. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा मुकाबला करीत रात्र जागून काढावी लागली. यात आर्थिक नुकसान मोठे झाले. सुदैवाने जिवित हानी झाली नाही.
मारेगाव तालुक्यातील वेगाव, मारेगाव, धामणी गोंडबुरांडा आदी गावांत ढग फुटी व्हावी, त्याप्रमाणे सुमारे दिड तास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे परिसरातील अनेक नदी-नाल्यांना पूर आला, तर अनेक शेतांमध्ये पाणी शिरून पिकांचे नुकसान झाले. रविवारी रात्री दिड तासात मारेगाव ४० मि.मी., कुंभा ६० मि.मी. आणि मार्डी येथे १५ मि.मी. पावसाची नोंद झाली. धामणी येथील महादेव रांगणकर याचे जुने घर कोसळले. मुसळधार पावसामुळे तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू असल्याची माहिती तहसीलदार दिपक पुंडे यानी दिली.