प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व वाटा मोकळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:01:05+5:30

प्रतिबंधित क्षेत्रातून कुणीही बाहेर पडणार नाही आणि कुणीही आत येणार नाही, याची काळजी घेतली जाते. मात्र बॅरिकेटींग केल्यानंतरही आणि पोलिसांचा पहारा असतानाही या क्षेत्रात बिनधास्त प्रवेश मिळत आहे. तसेच या परिसरातून अनेक नागरिक निवांतपणे बाहेर पडताना दिसून येत आहे. ‘लोकमत’ने शनिवारी केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून ही बाब उघडकीस आली आहे.

Free all shares in restricted areas | प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व वाटा मोकळ्या

प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व वाटा मोकळ्या

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाची धास्ती नाहीच : दररोज निवांत गप्पा, नागरिकांच्या मुक्त विहाराने कोरोना पसरण्याचा धोका, प्रशासन गाफिल

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तूर्तास हा आकडा एक हजार ११५ वर पोहोचला. यावर मात करण्यासाठी यवतमाळसह जिल्ह्यात प्रतिबंधित (कन्टोंमेन्ट) क्षेत्र तयार केले जात आहे. प्रतिबंधित क्षेत्रातून कुणीही बाहेर पडणार नाही आणि कुणीही आत येणार नाही, याची काळजी घेतली जाते. मात्र बॅरिकेटींग केल्यानंतरही आणि पोलिसांचा पहारा असतानाही या क्षेत्रात बिनधास्त प्रवेश मिळत आहे. तसेच या परिसरातून अनेक नागरिक निवांतपणे बाहेर पडताना दिसून येत आहे. ‘लोकमत’ने शनिवारी केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून ही बाब उघडकीस आली आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत ९० प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहे. यवतमाळ शहरात असे १० क्षेत्र आहे. पूर्वीच्या तुलनेत या क्षेत्राचा आकार एकदम लहान करण्यात आला. मात्र या भागातून अनेक व्यक्ती रात्री आणि दुपारच्या सुमारास बाहेर पडत असल्याचे दिसून आले. अनेक नागरिक प्रंतिबंधित क्षेत्रातून वाहनाचा वापर करून बाजारात शिरतात. दैनदिन वस्तूंची खरेदी करतात. यामुळे कोरोनाचा प्रसार थांबण्याऐवजी वाढण्याचा धोका वाढला आहे. याला काही व्यक्ती अपवाद आहे. मात्र प्रत्येक जण नियमांचे पालन करीत नाही. अनेकांना कोरानाचे गांभीर्य नाही. ते बिनधास्त विना मास्क आणि विना सोशल डिस्टन्स वावरताना दिसतात.
शनिवारी लक्ष्मीनगर परिसर प्रतिबंधित करण्यात आला. हा परिसर प्रशासनाने सील केला. यात एक बोळ सील करण्यात आली. त्यात ही गल्ली एका बाजूने बांबूंनी सीलबंद करण्यात आली. तर दुसऱ्या बाजूने पूूर्णत: खुली आहे. त्याला गेटच नसल्याने कुणीही बिनधास्त या क्षेत्रात जाऊ शकतात व तेथून बाहेर पडू शकतात. या भागात प्रवेश केला त्यावेळी एक व्यक्ती खुल्या बाजूने बाहेर आला. त्याने प्लास्टीक पाईपचा गुंडाळा दुसºया व्यक्तीच्या स्वाधीन केला. पाईप देताना हातावर केवळ सॅनिटायझर टाकले. प्रतिबंधित क्षेत्रातून आलेला रबरी पाईप दुसरीकडे नेण्यात आला. दुसºया बाजूला काही महिला बाहेर आल्या होत्या. त्या निवांत गप्पा करीत होत्या. विशेष म्हणजे शनिवारी तेथे एकही पोलीस आढळला नाही.
दारव्हा मार्गावरील जसराणा अपार्टमेंट प्रंतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. या ठिकाणी तीन इमारती आहेत. त्या बाहेर बांबू बांधण्यात आले. या परिसरात बाहेर दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी होती. ही ईमारत एका बाजूने अडविण्यात आली. दुसरीकडून बॅरिकेटस काढले होते. तेथे तैनात पोलीस कर्मचारी जेवणासाठी गेल्याचे सांगण्यात आले. काही वेळाने या इमारातीमधील एक व्यक्ती दुचाकीने बाहेरही गेल्याचे दिसून आले.
रंभाजीनगर, संभाजीनगरमधील गजानननगरात एका बाजूने बॅरिकेटस लावण्यात आले होते. दुसरीकडून रस्ता खुला होता. त्याच्या बाहेर दोन पोलीस तैनात होते. या परिसरातील व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्राबाहेर उभा होता. तो ये-जा करणाऱ्यांचे निरीक्षण करीत होता. नेमके कशाचे निरिक्षण सुरू होते याबद्दल साशंकताच आहे.

फळ विक्रेत्यांना खुली सूट
पोलीस मित्र कॉलनीला लागूनच साईनगरी आहे. या भागात काही घरालाच बॅरिकेटींग करण्यात आले. यातही एक फळ विक्रेता दुचाकीने या प्रतिबंधित क्षेत्रात शिरला. त्याने या भागात आतमध्ये फळे पाठविली. समोरूनही सॅनीटायझर घेऊन एक युवक आला. त्याने फळे घरात नेली. विशेष म्हणजे या ठिकाणी पोलीस सावलीत झाडाखाली मोबाईलवर सर्च करीत निवांतपणे आपली ड्युटी बजावत असल्याचे दिसले.

कळंब चौकात खुलेआम वावर
कळंब चौकात एकदम विदारक चित्र पहायला मिळाले. या ठिकाणी पोलिसांची व्हॅन आणि पोलिसही कर्तव्यावर होते. मात्र तरीही प्रतिबंधित क्षेत्रातून खुलेआम नागरिक दुचाकीने बाहेर पडत होते. अनेक नागरिक आतही जात होते. यामुळे प्रतिबंधित क्षेत्र म्हणजे नेमके काय, हेच कळेनासे झाले होते. एकूणच या संपूर्ण परिस्थितीने कोरोनाची कुणालाही धास्ती वाटत नसल्याचे दिसून आले. सर्वच बिनधास्त असल्याचे आढळले.


महिलांच्या निवांत गप्पा सुरूच
तारपुरा परिसरात सहा बोळींना बॅरिकेटस लावून बंद करण्यात आले आहे. मात्र एका बाजूने बॅरिकेटस उघडे आढळले. त्याच्याबाहेर महिलांचा मोठा समूह दुपारी हाकत होता. बंदीस्त भागातील महिलांना काही महिला बोलताना आढळल्या. या महिलांच्या वागण्यातून कुठेही हा पसिर प्रतिबंधित असल्याचे दिसून आले नाही. त्या नेहमीप्रमाणेच गप्पांमध्ये मश्गूल होत्या. या परिसरात नागरिकांच्या सुविधेसाठी दवाखान्याची व्यवस्था केली आहे. तेथील कर्मचारी मात्र प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे दिसून आले. तेथे दोन पोलीस तैनात होते.


केवळ अधिकाऱ्यांसमोर योग्य वागणूक
अधिकारी आणि पोलीस आले की आत दडायचे आणि त्यांचे वाहन गेले की पुन्हा बाहेर पडायचे, असा प्रकार सर्वत्र सुरू आहे. नागरिकांना कोरोनाची थोडीही धास्ती नाही. ते अगदी बिनधास्त वागत आहे. यातून कोरोनावर नियंत्रण मिळविण्याऐवजी जिल्ह्यात कोरोना वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Web Title: Free all shares in restricted areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.