जिल्हा होरपळतोय

By Admin | Updated: May 16, 2016 02:35 IST2016-05-16T02:35:08+5:302016-05-16T02:35:08+5:30

शहराच्या तापमानाने रविवारी उच्चांक गाठत पारा ४४.२ अंश सेल्सिअसवर पोहोचला. दोन दिवसांपासून उष्णतेचे लाट ..

District Hooplatoy | जिल्हा होरपळतोय

जिल्हा होरपळतोय

पारा ४४.२ : बाजाराचा दिवस असतानाही रस्त्यांवर शुकशुकाट
यवतमाळ : शहराच्या तापमानाने रविवारी उच्चांक गाठत पारा ४४.२ अंश सेल्सिअसवर पोहोचला. दोन दिवसांपासून उष्णतेचे लाट आली असून संपूर्ण जिल्हा होरपळून निघत आहे. अंगाची काहिली करणाऱ्या या उन्हाने दुपारी स्वयंघोषित संचारबंदीच दिसून येते. रविवारचा आठवडी बाजार असतानाही दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता.
एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा सोसलेल्या यवतमाळकरांना गत दोन आठवड्यात ढगाळ वातावरणाने चांगलाच दिलासा दिला. एप्रिल महिन्यात ४३.६ अंश सेल्सिअस असलेले तापमान मे महिन्याच्या सुरुवातीला ३७ अंशापर्यंत खाली आले होते. परंतु ढगाळी वातावरण निवळताच तापमानात प्रचंड वाढ झाली. ११ मे रोजी तापमान ३९.५ अंश, १२ मे रोजी ४० अंश, १३ मे रोजी ४२.४ अंश, १४ मे रोजी ४४ आणि रविवारी १५ मे रोजी ४४.२ अंश सेल्सिअसवर पारा जाऊन पोहोचला. अंगाची काहिली करणारा उकाडा कुलरनेही कमी होत नव्हता. दुपारच्या वेळात कुलरमधूनही गरमा हवा फेकली जात होती.
रविवार यवतमाळचा आठवडी बाजार असतो. या बाजारावर तापमानाचा परिणाम जाणवला. दर रविवारी दत्त चौकातील रस्ते गर्दीने फुलून गेलेले असतात. दुपारी १२ ते ४ या दरम्यान रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. दत्त चौकातील भाजी मंडीत विक्रेत्यांनी उन्हापासून बचावासाठी छत्र्या लावल्या होत्या. या छत्र्यांचा आधार घेत ग्राहकांची प्रतीक्षा विक्रेते करीत होते. आठवडीबाजारातही असेच दृश्य होते.
सायंकाळी ४ पर्यंत ग्राहकच बाजाराकडे फिरकले नाही. शहराच्या सर्वच रस्त्यावर दुपारी जणू संचारबंदी लागल्यागत स्थिती होती. सायंकाळी शीतपेयांच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत होते. रात्री उशिरापर्यंत उन्हाच्या झळा जाणवत होत्या. रस्त्यावर गरम वाफा निघत असल्याचे भासत होते. या उन्हामुळे रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली असून वैद्यकीय महाविद्यालयात उष्माघात कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. (शहर वार्ताहर)

Web Title: District Hooplatoy