कलेक्टर साहेब, कन्टेन्मेट झोनमधील दारू विक्री बंद करा हो ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:42 IST2021-04-16T04:42:46+5:302021-04-16T04:42:46+5:30
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन व्यापाऱ्यांकडून काटेकोरपणे केले जात आहे. जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी मद्य विक्रीच्या दुकानदारांना ३० एप्रिलपर्यंत विक्री बंद ...

कलेक्टर साहेब, कन्टेन्मेट झोनमधील दारू विक्री बंद करा हो ...
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन व्यापाऱ्यांकडून काटेकोरपणे केले जात आहे. जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी मद्य विक्रीच्या दुकानदारांना ३० एप्रिलपर्यंत विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र, फुलसावंगी याला अपवाद ठरत आहे. येथे सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत देशी, विदेशी दारु एका फोनवर मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे.
दीडपट जादा दराने दारू विक्री होत आहे. व्यसनाच्या आहारी गेलेले लाॅकडाऊनमुळे रोजगार नसल्याने धान्य, भांडी विकून अव्वाच्या सव्वा दराने दारु विकत घेत आहे. त्यामुळे कुटुंबातील महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाबद्दल महिलांमध्ये रोष आहे. येथे एवढे पोलीस कर्मचारी असताना मोठ्या प्रमाणात दारु विक्री कशी होते, हा संशोधनाचा विषय आहे. विशेष म्हणजे, दारुबंदी विभागाने फुलसावंगीच्या सर्व दारुच्या दुकानांना व गोदामाला सील केले आहे. तरीही मोठ्या प्रमाणात येथे दारु कुठून उपलब्ध होते, हासुध्दा प्रश्नच आहे. कदाचित ही दारु बनावट असण्याची शक्यता आहे. दारु बनावट असेल, तर मद्यपींचे आरोग्यच धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे.
बॉक्स
पंटर असतात डेरा टाकून
दारु दुकानाच्या व बारच्या बाजूला अवैध दारू विक्रेत्यांचे ‘पंटर’ डेरा टाकून बसलेले असतात. त्यांना एक फोन केल्यास केल्यास देशी, कोणतीही विदेशी दारु सहज उपलब्ध होते. त्यामुळे कन्टेन्मेट झोनमध्ये हा व्यवसाय सुरळीत चालवून तळीरामांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. हा खेळ त्वरित थांबविण्यासाठी कलेक्टर साहेब, कन्टेन्मेट झोनमधील दारू विक्री बंद करा हो, असा टाहो महिला फोडत आहेत.