मेडिकलच्या कोविड वार्डाची डॉक्टरांना अ‍ॅलर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:01:16+5:30

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वार्डात डॉक्टरच फिरकत नसल्याचे धक्कादायक वास्तव कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने मांडले आहे. केवळ नर्सेस तीन वेळा राऊंड घेऊन तोंडी विचारपूस करीत उपलब्ध औषधी देतात. साधे खोकल्याचेही औषध येथे मिळत नाही. कित्येक तास पिण्याचे पाणी नसते. ही आपबिती कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने कथन केली.

Allergy to the doctor of the medical Kovid ward | मेडिकलच्या कोविड वार्डाची डॉक्टरांना अ‍ॅलर्जी

मेडिकलच्या कोविड वार्डाची डॉक्टरांना अ‍ॅलर्जी

Next
ठळक मुद्देनर्सेस सांभाळतात कारभार : औषधी नाहीच, पाणीही अपुरे, प्रत्यक्ष रुग्णानेच मांडले भीषण वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला उपचारासाठी मोठ्या विश्वासाने आरोग्य यंत्रणेच्या ताब्यात दिले जाते. प्रत्यक्ष मात्र या विश्वासाला तडा देण्याचे काम सुरू आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वार्डात डॉक्टरच फिरकत नसल्याचे धक्कादायक वास्तव कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने मांडले आहे. केवळ नर्सेस तीन वेळा राऊंड घेऊन तोंडी विचारपूस करीत उपलब्ध औषधी देतात. साधे खोकल्याचेही औषध येथे मिळत नाही. कित्येक तास पिण्याचे पाणी नसते. ही आपबिती कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने कथन केली.
मेडिकलच्या आयसोलेशन वार्डात पॉझिटिव्ह रुग्णांची हेळसांड होत आहे. बाह्यजगतात मात्र सर्व आलबेल असल्याचा देखावा मेडिकलच्या यंत्रणेकडून निर्माण केला जातो. गुरुवार २३ जुलैपासून आयसोलेशन वार्डात एकही डॉक्टर फिरकला नाही. नर्सेस दिवसातून तीन वेळा औषधाचे डोज घेऊन येतात. दुरुनच चौकशी करून निघून जातात. वयोवृद्ध व मधुमेह असलेल्या रुग्णांची अवस्था बिकट आहे. या रुग्णांना दिवसातून तीन ते चार वेळा नाश्ता घ्यावा लागतो. घरुन आलेला डबाही दोन ते तीन तास रुग्णापर्यंत पोहोचविला जात नाही.
सलाईन काढले मध्यरात्री
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला १ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता लावलेले सलाईन रात्री ११ वाजता काढले. त्यासाठीही थेट विभाग प्रमुख, प्रशासन प्रमुख यांना फोनद्वारे माहिती द्यावी लागली. आधीच श्वास घेण्यास त्रास, सलाईन काढायलाही वार्डात कुणी उपलब्ध होत नाही.


रुग्णालयापेक्षा भाई अमनचे भोजन दर्जेदार
रुग्णालयाच्या मेसमध्ये तयार होणारे भोजन अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत. सामान्य कुटुंबातील व्यक्तीही चार घास खावू शकेल असा त्याचा दर्जा नाही. कोरोना रुग्ण केवळ भाईअमन या दात्याच्या डब्याची वाट पाहत असतात. दोन वेळ त्यांचा डबा न चुकता येतो, त्यावरच कोरोना रुग्णांचा गुजारा होत असल्याचे वास्तव तेथील रुग्णांनी सांगितले. जेवणाच्या अनेक तक्रारी येवूनही दर्जा सुधारला नाही.


पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा
आठ ते दहा तास पाण्यासाठी वाट पाहत रहावे लागते. कोरोना वार्डात पिण्याचे पाणीही मिळत नाही. पहिल्या दिवसांपासून रुग्णांची ही तक्रार कायम आहे. रुग्णालय प्रशासनाने यात कोणतीही सुधारणा केली नाही. काही आर्थिक संपन्न रुग्ण बाहेरुन पिण्याच्या पाण्याचे बॉक्स मागवतात. गरिबांची मात्र परवड सुरू आहे. इतकी गंभीर स्थिती असूनही प्रशासन सारवासारव करीत आहे.

खोकल्याच्या औषधींचा तुटवडा
एकीकडे जिल्हा प्रशासन कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी पैशाची कमतरता नाही. औषधी मुबलक आहे असे ठासून सांगत आहे. प्रत्यक्ष मात्र कोरोना रुग्णाला वार्डात काही दिवसांपासून खोकल्याचे औषधच मिळाले नाही. कोरोना रुग्णांमध्ये खोकल्याचा प्रचंड त्रास असते. त्यामुळे फुफ्फुस दुखायला लागतात. तरीही औषध मिळत नाही.

प्रत्येक रुग्णाची योग्य ती काळजी घेतली जात आहे. त्या रुग्णाने मला रात्री ९ वाजता फोन केला होता. तत्काळ त्याची समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या. प्रशासन प्रत्येकाला पूर्णत: बरे करण्यासाठी यंत्रणेत समन्वय ठेवत आहे.
- एम.डी. सिंह
जिल्हाधिकारी, यवतमाळ.

कोरोना समन्वयक म्हणतात, प्रत्येक रुग्णाजवळ डॉक्टर उभे करणे अशक्य
या संदर्भात मेडिकलचे कोरोना समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे म्हणाले, आयसोलेशन वार्डात डॉक्टर फिरकत नाही हा आरोप पूर्णत: खोटा आहे. प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र पाच डॉक्टरची नियुक्ती केली आहे. आठवड्याला ३५ जण कोरोना वार्डात काम करतात. प्रत्येक रुग्णाजवळ डॉक्टर उभे करणे सध्याच्या परिस्थितीत शक्य नाही. खोकल्याची औषधी संपलेली आहे. त्याचा पुरवठा करण्यासाठी शासनाला पत्र दिले आहे. रुग्णाला बाहेरुन औषधी आणण्यासाठी लिहून देऊ नये, असे निर्बंध घालण्यात आले आहे. खोकल्याची औषधी एक-दोन दिवसात मिळणार आहे. रुग्णांना ट्रीपल लेअर मास्क देण्यात आले आहे. बिल्डींगची लिफ्ट बंद असल्याने पाणी पोहचविताना अडचण येते मात्र तेथे आरप्लॉन्ट बसविला आहे. तक्रार करणाऱ्या रुग्णाला मानसोपचार तज्ज्ञाला दाखविले. तो रुग्ण फार घाबरत आहे. कोरोनात रुग्णाने धीर सोडणे धोकादायक आहे. डॉ. नूर यांनी त्या रुग्णाचे बराच वेळ समूपदेशन केले आहे. तक्रार करायची असेल तर कशाचीही तक्रार होऊ शकते. मेडिकलची यंत्रणा अहोरात्र झटत आहे.

Web Title: Allergy to the doctor of the medical Kovid ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.