Vidarbha Crime: ...अन् पती-पत्नीने मध्यरात्री विहिरीत उडी मारली, वडिलांनी सांगितलं दोघांमध्ये काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:57 IST2025-11-27T15:54:52+5:302025-11-27T15:57:45+5:30
पती-पत्नीने रात्री एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेने गावात खळबळ उडाली. रात्री त्यांचा शोध घेतल्यानंतर मृतदेह मिळाले.

Vidarbha Crime: ...अन् पती-पत्नीने मध्यरात्री विहिरीत उडी मारली, वडिलांनी सांगितलं दोघांमध्ये काय घडलं?
टोकाचे पाऊल उचलत पती पत्नीने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २५ नोव्हेंबरच्या रात्री वाशिम जिल्ह्यातील स्वासिन गावात घडली. अमोल जगताप (वय ४०) व सीमा अमोल जगताप (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत.
स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर ठाणेदार किशोर शेलके यांनी अकोला जिल्ह्यातील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित पिंजरच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर बचाव पथकातील अतुल उमाळे, गोपाल गिरे, अजय डाके, शुभम भोपळे, अपूर्व चेके, राहुल निंबाळकर आणि प्रदीप आडे यांना सर्च ऑपरेशनसाठी रवाना करण्यात आले.
पथकाने विहिरीत प्रथम महिलेचा मृतदेह व त्यानंतर पतीचा मृतदेह शोधून बाहेर काढला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार आणि नायब तहसीलदार रवी राठोड यांनीही परिस्थितीची माहिती घेतली
अमोल यांच्या वडिलांनी तक्रारीत काय म्हटलंय?
किसन जगताप यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा अमोल जगताप (वय ४०) आणि सून सीमा अमोल जगताप (वय ३५) यांच्यात घरगुती कारणावरून शाब्दिक वाद झाला होता.
याच कारणावरून दि. २५ नोव्हेंबर रोजी रात्री दोघांनी सहदेव हिसेकर यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.