‘शकुंतला’ रेल्वेचा वनवास संपण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:49 IST2021-09-09T04:49:12+5:302021-09-09T04:49:12+5:30

वाशिम : सन १९१३ मध्ये ब्रिटिशांनी सुरू केलेल्या ‘शकुंतला’ रेल्वेचा वनवास संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आमदार राजेंद्र पाटणी ...

Signs of the end of Shakuntala railway banishment | ‘शकुंतला’ रेल्वेचा वनवास संपण्याची चिन्हे

‘शकुंतला’ रेल्वेचा वनवास संपण्याची चिन्हे

वाशिम : सन १९१३ मध्ये ब्रिटिशांनी सुरू केलेल्या ‘शकुंतला’ रेल्वेचा वनवास संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आमदार राजेंद्र पाटणी यांच्या पाठपुराव्याची दखल घेत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या लोहमार्गाच्या गेज परिवर्तनासाठी रेल्वे मंत्रालयाला पत्र पाठविले असून, या पत्राला गांभीर्याने घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कार्यवाही सुरू केल्याची माहिती आमदार पाटणी यांनी दिली.

१९४७ मध्ये देश हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला असला तरी ‘शकुंतला’ इंग्रजांच्याच ताब्यात होती. प्रारंभी ईस्ट इंडिया कंपनीच्या मालकीचा असलेला हा लोहमार्ग त्यानंतर इंग्लंडमधील निल्सन अँड निल्सन कंपनीच्या ताब्यात गेला होता. भारत सरकार आणि या कंपनीमध्ये झालेल्या वाटाघाटीनुसार हा लोहमार्ग भारत सरकारच्या ताब्यात आला. हा लोहमार्ग वाशिम, अकोला, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यांतून जातो. विसाव्या शतकाच्या प्रारंभी वऱ्हाडात दळणवळणाची पुरेशी साधने नसताना ‘शकुंतले’ने चारही जिल्ह्यांतील नागरिकांना ती वानवा जाणवू दिली नव्हती. आता मात्र हीच शकुंतला मृत्युशय्येवर पडली आहे. हा लोहमार्ग कायमस्वरूपी बंद झाल्यास मूर्तिजापूर वगळता इतर सर्वच शहरे रेल्वेच्या नकाशावरून गायब होणार आहेत. नेमकी हीच बाब हेरून कारंजा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी शकुंतलेच्या लोहमार्गाचे गेज परिवर्तन करून शकुंतलेचा वनवास संपविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेटून व पत्रव्यवहार करून आ. पाटणी यांनी या लोहमार्गाच्या गेज परिवर्तनाच्या कामात लक्ष घालण्याची विनंती केली. गडकरींनीदेखील त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना या कामात लक्ष घालण्यासाठी पत्र लिहिले आहे. गडकरींच्या पत्रानंतर रेल्वेमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला असून, लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली आहे.

००००००

शकुंतलेच्या नॅरोगेज रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी नितीन गडकरींना साकडे घातले होते. त्यानंतर त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना याबाबत पत्र लिहिले असून, त्यांनीही सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

- राजेंद्र पाटणी,

आमदार कारंजा विधानसभा मतदारसंघ

Web Title: Signs of the end of Shakuntala railway banishment