PM Kissan Scheme : १.८८ लाख शेतकऱ्यांना मिळतेय प्रत्येकी दोन हजार रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 10:27 IST2021-05-19T10:26:42+5:302021-05-19T10:27:17+5:30
PM Kissan Scheme: सातव्या हप्त्याचे प्रत्येक दोन हजार रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असून, बँक खात्यात रक्कम जमा केली जात आहे.

PM Kissan Scheme : १.८८ लाख शेतकऱ्यांना मिळतेय प्रत्येकी दोन हजार रुपये!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पीएम (प्रधानमंत्री) किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र १.८८ लाख शेतकऱ्यांसाठी सातव्या हप्त्याचे प्रत्येक दोन हजार रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असून, बँक खात्यात रक्कम जमा केली जात आहे. बँकेतून ही रक्कम काढण्यासाठी शेतकरी बँकांकडे धाव घेत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना ही अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी असून, त्यांना या योजनेतून दरवर्षी सहा हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य तीन टप्प्यांत समप्रमाणात दिले जाते.
वर्षातील पहिला हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलै, दुसरा हप्ता १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता १ डिसेंबर ते ३१ मार्च दरम्यान पाठविला जातो. आधार कार्ड, बँक खाते, सातबारा उतारा व रहिवाशी प्रमाणपत्र आदी कागदपत्रांच्या आधारे संकेतस्थळावर माहिती अपलोड झालेल्या जिल्ह्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या १ लाख ९९ हजार ३३३ आहे.
यापैकी जवळपास १२ हजार शेतकरी अपात्र ठरले आहेत. यंदा कोरोनाच्या काळात मे महिन्यापासून या वर्षातील पहिला हप्ता तर योजना लागू झाल्यापासूनचा सातवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
ही रक्कम काढण्यासाठी शेतकऱ्यांची बँकांमध्ये गर्दी होत असल्याचे दिसून येते.
शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा !
ऐन खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या वेळी दोन हजार रुपये असल्याने अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. मात्र, कोरोनाच्या काळात बँकांमध्ये गर्दी होत असल्याने पैसे काढण्यासाठी जात असताना, शेतकऱ्यांमध्ये कोरोनाची थोडी धाकधूकही आहे. बँकांमधील या गर्दीतून कोरोना संसर्ग तर होणार नाही, अशी भीतीही असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.
पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दोन हजार रुपये संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. बँकेत गर्दी होणार नाही, याचे नियोजन करून बँक खात्यातील पैसे काढावे. प्रत्येकाकडून कोरोनाविषयक नियमाचे पालन झाले, तर इतरांना संसर्ग होणार नाही.
- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम