शासकीय गोदामातून २५ लाखांचा गुटखा जप्त

By Admin | Updated: December 18, 2014 00:57 IST2014-12-18T00:57:32+5:302014-12-18T00:57:32+5:30

अकोला पोलिसांची कारवाई; एक आरोपी गजाआड, दुसरा फरार.

Gutka of 25 lakhs seized from government godown | शासकीय गोदामातून २५ लाखांचा गुटखा जप्त

शासकीय गोदामातून २५ लाखांचा गुटखा जप्त

अकोला: राष्ट्रीय महामार्गावरील कलकत्ता ढाब्यासमोर असलेल्या शासकीय गोदामावर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाने बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास छापा घालून २५ लाखरुपयांचा गुटखा जप्त केला. छाप्यादरम्यान पोलिसांनी एका आरोपीस अटक केली तर दुसर्‍या आरोपीस पकडण्यात पोलिसांना अपयश आले.
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला महामार्गावरील शासकीय गोदामामध्ये लाखो रुपये किमतीचा गुटखा लपविण्यासाठी आणल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी छापा घातला असता, गोदामामधील अवैध गुटख्याचा साठा एमएच ३0 एबी ३२१0 क्रमांकाच्या टाटा ट्रकमध्ये भरण्याचे काम सुरू होते. पोलिसांना पाहून मुख्य सूत्रधार बैदपुर्‍यात राहणारा वहीद खान जाकिर खान व तरबेज खान युनूस खान हे पळू जाऊ लागले. पोलिसांनी दोघांचा पाठलाग केला.
पोलिसांनी तरबेज खान याला अटक केली. वहीद खान हा मात्र फरार होण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी शासकीय गोदामाची झडती घेतली असता, गोदामामध्ये वहिद खान याच्या मालकीचा विविध प्रकारच्या गुटख्याचा व सुगंधित तंबाखूचा अवैध साठा मिळून आला. पोलिसांनी ट्रकसहीत गोदामातील गुटख्याचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या गुटख्याची किंमत २५ लाख रुपये आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील एपीआय सचिन जाधव, पीएसआय ए.पी. खोडेवाड, पोलीस शिपाई राज चंदेल, अन्सार शेख, संदीप तराळे, इरफान अली, बापू चव्हाण यांनी केली.

Web Title: Gutka of 25 lakhs seized from government godown