‘बाप्पां’च्या स्वागतासाठी गणेशभक्त सज्ज!

By Admin | Updated: September 5, 2016 02:53 IST2016-09-05T02:53:45+5:302016-09-05T02:53:45+5:30

वाशिम जिल्ह्यात ६३९ ठिकाणी होणार गणेश स्थापना.

Ganapati is ready for 'Bappa'! | ‘बाप्पां’च्या स्वागतासाठी गणेशभक्त सज्ज!

‘बाप्पां’च्या स्वागतासाठी गणेशभक्त सज्ज!

वाशिम, दि. ४ : सुखकर्ता, दुखहर्ता गणरायाची सोमवार, ५ सप्टेंबर रोजी विधिवत स्थापना होणार असून, गणरायाच्या स्वागतासाठी संपूर्ण जिल्हा सज्ज झाला आहे. यावर्षी १३ पोलीस स्टेशन परिक्षेत्रात एकंदरित ६३९ गणेश मंडळांकडून 'बाप्पा'ची विधिवत स्थापना केली जाणार आहे.
घरगुती गणरायासोबतच सार्वजनिक गणेश मंडळे विविध ठिकाणी बसविणार्‍या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी सज्ज झाली आहेत. वाशिम शहरासह जिल्ह्यात प्रत्येक शहरात गणरायाचे आगमन आणि विसर्जन ही गणेशभक्तांसाठी एक मोठी पर्वणी असते. या उत्सवासाठी सर्व तयारीनिशी सज्ज झाल्याचा दावा प्रशासनानेदेखील केला आहे. रस्ते दुरुस्ती, परवाने, होडिर्ंग्ज आणि कायदा व सुव्यवस्था या विषयांवर समन्वय साधून सेवा-सुविधांची व्यवस्था स्थानिक प्रशासन करीत असते. उत्सव साजरा करताना गणेशभक्त आणि मंडळांना कोणत्याही समस्या जाणवू नयेत, हा या सर्व तयारीचा उद्देश असतो. एकिकडे गणरायाच्या आगमनाचा उत्साह, तर दुसरीकडे यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे ग्रामीण भागातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, गणेशोत्सव थाटामाटात साजरा होणार आहे.
वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरुळपीर व मानोरा शहरातील गणेशभक्तांनी गणरायांच्या मुक्कामासाठी मंडप सजावटीची तयारी पूर्ण केली आहे. महागाईची झळ सोसूनही विविध प्रकारच्या मूर्तींची बुकिंग करण्यात आलेली आहे. गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने अतिरिक्त पोलीस कुमक तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Ganapati is ready for 'Bappa'!