CoronaVirus: Death toll in Washim district on the verge of a century! | CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात मृतांचा आकडा शतकाच्या उंबरठ्यावर !

CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात मृतांचा आकडा शतकाच्या उंबरठ्यावर !

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याबरोबरच उपचारादरम्यान मृत्यू होण्याच्या प्रमाणातही वाढ होत असल्याचे दिसून येते. आतापर्यंत ९५ जणांचा मृत्यू झाला. या ९५ जणांमध्ये ५५ वर्षावरील ६८ जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण हा ३ एप्रिल रोजी मेडशी (ता.मालेगाव) येथे आढळला होता. एप्रिल ते जून या तीन महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रित होती तसेच कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला होता. जुलै महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने झाला; शिवाय कोरोनाबळींची संख्याही वाढली. जुलै महिन्यात उपचारादरम्यान १३ जणांचा मृत्यू झाला. आॅगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतकांचा आकडाही वाढला. सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या तसेच मृतकांचा आकडाही बराच फुगला. आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यातील ९५ जणांना प्राण गमवावे लागले. अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आणि कोरोनाबळींची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने सरकारी कोविड केअर सेंटरप्रमाणेच जिल्ह्यात आतापर्यंत तीन खासगी कोविड हॉस्पिटललाही मान्यता दिली.

५५ वर्षावरील ६८ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात ५५ वर्षावरील ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे वयोवृद्धांना अधिक धोका असल्याचे यावरून स्पष्ट होते. वयोवृद्ध नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून वयोवृद्ध नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, आरोग्य जपावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या जास्त प्रमाणात वाढली. उपचारादरम्यान मृत्यू होणाºयांची संख्याही ९५ च्या घरात आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.
-डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम

Web Title: CoronaVirus: Death toll in Washim district on the verge of a century!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.