A base price shopping center will be opened in Washim district | वाशिम जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी केंद्र सुरू होणार
वाशिम जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी केंद्र सुरू होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सन २०१९-२० मध्ये वाशिम जिल्ह्यात नाफेड मार्फत केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मुग, उडीद व सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्याचे नियोजन असून,  याकरिता इच्छुक संस्थांकडून अकोला जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांनी प्रस्ताव मागविले आहेत.
मूग, उडीद व सोयाबीन या शेतमालाची खरेदी हमीभावानुसार होण्यासाठी नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरू केली जाणार आहेत. खरेदी केंद्र मंजूर करताना जिल्हा किंवा तालुकास्तरावरील अ वर्ग सभासद असलेले खरेदी विक्री संघ, पणन व प्रक्रिया सहकारी अ वर्ग सभासद संस्था, ज्या ठिकाणी दोन्ही अ वर्ग सभासद संस्था कार्यरत नाहीत, त्याठिकाणी इतर सहकारी संस्थेस ब वर्ग सभासद करून घेवून खरेदीचे काम देणे व खाजगी बाजार समिती असा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. मॉयश्चर मीटर, चाळणी, ताडपत्री, संगणक, संगणक चालविण्याची क्षमता असलेले जनरेटर, स्कॅनर असलेला स्मार्ट फोन, संगणक हाताळणेकरिता प्रशिक्षित सेवकवर्ग, इलेक्ट्रॉनिक वजन काटा आदी साधनसामग्री व मनुष्यबळ खरेदी करणाºया संस्थेकडे उपलब्ध असल्याचा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचा दाखला संस्थेकडे असणे आवश्यक आहे.
वखार महामंडळाच्या गोदामात साठवणुकीपूर्वी संस्थेचे स्वत:चे किंवा भाड्याचे गोदाम असल्याचे, अन्नधान्य अथवा कडधान्य व तेलबिया इत्यादी खरेदी विक्रीचा किमान १ वर्षाचा अनुभव, खरेदी केंद्र चालविण्याकरिता आवश्यक सेवक उपलब्ध असल्याचे व काळ्या यादीत अथवा अपहार अथवा फौजदारी गुन्हा या संबंधी कार्यवाही झालेली नसल्याचे सहाय्यक निबंधक यांचे प्रमाणपत्र संस्थेने घेणे आवश्यक आहे. संस्थेकडून खरेदी अथवा नोंदणीमध्ये गैरव्यवहार, अनियमितता झाल्यास प्रशासकीय खर्च देय असणार नाही, ही अट मान्य असल्याचे संमतीपत्र आदी कागदपत्रे इच्छुक संस्थांनी देणे बंधनकारक आहे. खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी इच्छुक संस्थांनी अधिक माहितीसाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी अधिकारी कार्यालय, आदर्श कॉलनी, अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांनी केले.

Web Title: A base price shopping center will be opened in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.