अवैध गौण खनिजप्रकरणी १७ लाखांचा दंड वसूल

By Admin | Updated: February 12, 2016 01:57 IST2016-02-12T01:57:00+5:302016-02-12T01:57:00+5:30

तीन वाहने पकडली; वाशिम तहसीलची कारवाई.

17 lakh penalty for illegal mineral resources | अवैध गौण खनिजप्रकरणी १७ लाखांचा दंड वसूल

अवैध गौण खनिजप्रकरणी १७ लाखांचा दंड वसूल

वाशिम: चोरट्या मार्गाने गिट्टीची वाहतूक करणारे दोन ट्रक व लाकडाचा एक ट्रॅक्टर वाशिम तहसील कार्यालयाच्या पथकाने रंगेहात पकडून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, ८ फेब्रुवारीपर्यंंत १३४ वाहनांवर कारवाई करून १६ लाख ९७ हजार ९00 रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला. वाशिम तालुक्यात पैनगंगा नदीपात्रात बर्‍यापैकी रेती उपलब्ध आहे; मात्र १७ पैकी केवळ दोन रेतीघाटांचा लिलाव झाला असून, उर्वरित घाटांमधून रेतीची चोरट्या मार्गाने वाहतूक होत आहे. याप्रमाणेच मुरूम, डब्बर, गिट्टी आदी गौण खनिजाची वाहतूकदेखील बिनधास्त सुरू आहे. गौण खनिजाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी वाशिम तहसील कार्यालयाने विशेष पथक गठित केले असून, कारवायांच्या मोहिमेला गती दिली आहे. यावर्षी गौण खनिजाच्या महसूल उद्दिष्टातदेखील वाढ करण्यात आली आहे. १ एप्रिल २0१५ ते ८ फेब्रुवारी २0१६ या दरम्यान एकूण १३४ वाहने पकडण्यात आली. या वाहनधारकांकडून १६ लाख ९७ हजार ९00 रुपयांचा दंड वसूल केला. दहा फेब्रुवारीला गिट्टीची वाहतूक करणारा एक ट्रक पकडून तपासणीसाठी तहसील कार्यालय परिसरात लावण्यात आला. या ट्रकमध्ये दोन ब्रास गिट्टी असून, पावत्यांची तपासणी सुरू आहे. तपासणीअंती कारवाईची दिशा निश्‍चित होणार आहे. आठ फेब्रुवारीला तीन ब्रास गिट्टी घेऊन जाणारा ट्रक पकडून तहसील कार्यालयात लावण्यात आला. याप्रकरणीदेखील चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येते. तसेच लाकडाचा ट्रॅक्टर पकडून दंडात्मक कारवाई केली.

Web Title: 17 lakh penalty for illegal mineral resources