अपुऱ्या पाणीपुरवठ्याने करपली-भेगाळली भातशेती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 12:00 AM2021-04-19T00:00:08+5:302021-04-19T00:00:19+5:30

डहाणू तालुक्यातील स्थिती : पेठ परिसरातील ४०-५० एकर शेती वाया जाण्याची भीती

Paddy cultivation mixed with insufficient water supply | अपुऱ्या पाणीपुरवठ्याने करपली-भेगाळली भातशेती 

अपुऱ्या पाणीपुरवठ्याने करपली-भेगाळली भातशेती 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
कासा : सूर्या कालव्यातून होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कालव्यांना जोडणाऱ्या टोकाच्या बऱ्याच गावातील शेती वाया जाण्याची भीती असून पाण्याअभावी पेठ येथील ४० ते ५० एकर भातशेती ऐन दाणे भरण्याच्या हंगामात करपून जाण्याची भीती येथील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.


कोरोना काळात बरेच लहानमोठे शेतकरी सगळे कामधंदे बंद असल्याने आपल्या भातशेतीवर अवलंबून आहेत, मात्र इथेही कालव्यातून अनियमित व अपुरा पाणीपुरवठा तसेच कामगारांची कमतरता यामुळे सुरळीत पाणीपुरवठा केला जात नाही. त्यामुळे शेतीवर परिणाम होत आहे. डहाणू तालुक्यातील तवा, धामटने, पेठ, सूर्यानगर, वेती, वरोती, मुरबाड, वांगर्जे कासा, चारोटी, सारणी, आंबिवली, उर्से, साये, आंबिस्ते, रणकोळ, रानशेत आदी, तर पालघर तालुक्यातील सोमटा, आंबेदा, नानिवली, रावते, बोरशेती, चिंचारे, आकेगव्हाण, महागाव, कुकडे आदी सुमारे १०० गावांना उजव्या व डाव्या कालव्यांतर्गत शेतीसाठी उन्हाळ्यात पाणीपुरवठा केला जातो. सिंचन या प्रमुख उद्देशाने या धरणाची निर्मिती केली असली तरी आता बिगरसिंचनासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामधून जलसंपदा विभागास दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल मिळतो, मात्र तरीही कालवे दुरुस्ती व कालवे देखभाल व शेतीला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कामगारांची नेमणूक करत नाहीत. त्यामुळे नाहक पाणीही बऱ्याच ठिकाणी वाया जाते. त्यामुळे कालव्यांना टोकाला जोडणाऱ्या बऱ्याच गावांना अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाण्याअभावी भातपिकावर परिणाम होत आहे. याबाबत शेतकरी वारंवार तक्रारी करतात, मात्र तरीही या बाबीकडे जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी लक्ष देत नाहीत. तालुक्यातील पेठ येथे सुरळीत पाणीच पोहोचत नाही. त्यामुळे येथील शेतकरी आपल्या शेतात पाणी वाळून घेण्यासाठी रात्री १२ ते १ वाजेपर्यंत जागरणही करतात.

कालव्यातून शेतीला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने भातपिके करपू लागली आहेत.
- हरेश्वर ठाकूर,
 शेतकरी, पेठ

कालव्यांतून सततच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे शेतीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे भातशेती वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
- नरोत्तम पाटील, 
शेतकरी, पेठ

Web Title: Paddy cultivation mixed with insufficient water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.