सलग दुसऱ्या दिवशी गावठी दारूमुळे युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:00 AM2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:00:27+5:30

हनुमान पवार हा मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होता. याविषयी कुटुंबीयांनी पुलगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. रविवारी सकाळी पारधी बेड्यापासून ५० मीटर अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, गावात एकच खळबळ उडाली. त्याचा गावठी दारूनेच मृत्यू झाल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Youth dies of village alcohol for second day in a row | सलग दुसऱ्या दिवशी गावठी दारूमुळे युवकाचा मृत्यू

सलग दुसऱ्या दिवशी गावठी दारूमुळे युवकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देवायफड येथील घटना : पोलिसांचा नाकर्तेपणा; ग्रामस्थांत असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील वायफड येथे सलग दुसऱ्या दिवशी गावठी दारूने युवकाचा बळी घेतला. हनुमान नारायण पवार (४०) रा. वायफड असे मृत युवकाचे नाव आहे.
हनुमान पवार हा मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होता. याविषयी कुटुंबीयांनी पुलगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. रविवारी सकाळी पारधी बेड्यापासून ५० मीटर अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, गावात एकच खळबळ उडाली. त्याचा गावठी दारूनेच मृत्यू झाल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
वायफड येथे पारधी बेड्यावर मोठ्या प्रमाणावर दारू गाळण्यासह विक्री होते. याविषयी ग्रामस्थांकडून सातत्याने ओरड होत असताना पुलगाव पोलिसांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना येथे गावठी दारूचे अक्षरश: पाट वाहत असल्याचे चित्र आहे. यापूर्वी गावातीलस संजय भाऊराव आत्राम (४०) हा युवक २९ मे रोजी घरून निघून गेला. त्याला दारूचे प्रचंड व्यसन जडले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाही.
शनिवारी सकाळी पारधी बेड्याजवळील बाभळीच्या झाडाखाली त्याचा मृतदेह आढळून आला. ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. अति मद्य सेवनानंतर पिण्यास पाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी वर्तविला.
पुलगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. ही घटना ताजी असतानाच रविवारी पारधी बेड्यापासून ५० मीटर अंतरावर हनुमान पवार या युवकाचा मृतदेह आढळून आला. पुलगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास करीत आहेत. सलग दुसºया दिवशी गावठी दारूमुळे युवकाचा बळी गेल्याने गावात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये असंतोष खदखदत आहे.

पावडरपासून गावठी दारूनिर्मिती
वायफड येथील पारधी बेड्यावर फार मोठ्या कालावधीपासून दारूभट्ट्यांचा धूर निघतो. जीवघेण्या पावडरपासून गावठी दारूची निर्मिती केली जात असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

पोलीस तैनात तरीही...
गावठी दारूभट्टीवर कारवाईची मागणी झाल्यानंतर काही पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. पोलस कर्मचारी सकाळी १० पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत तैनात असतात. ते निघून जाताच दारूनिर्मिती आणि विक्रीला ऊत येतो. इतकेच नव्हे, तर पोलीस तैनात असताना पारखी बेड्याच्या मागील भागात राजरोसपणे दारूविक्री होत असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राजकीय हस्तक्षेप येतोय कारवाईत आड
देशभरासह राज्यात कोरोना विषाणू संसर्गाने थैमान घातले आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक भयभीत आहेत. दारूमुळेच कोरोनाचे संक्रमण होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन कित्येक दिवसांपासून वायफड येथील नागरिक दारूविक्रीवर अंकुश लावण्याची मागणी करीत आहेत. मात्र, पोलीस जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असून राजकीय हस्तक्षेपही दारूव्यवसायाला अभय देणारा ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Web Title: Youth dies of village alcohol for second day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.