पटसंख्या वाढविण्यासाठी यंदाही पालक संपर्क अभियान

By Admin | Updated: April 21, 2016 02:27 IST2016-04-21T02:27:59+5:302016-04-21T02:27:59+5:30

शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी मागील वर्षी जिल्हा परिषद शाळांमधील रोडावत चाललेली पटसंख्या वाढविण्यासाठी पालक संपर्क अभियान राबविले होते.

Spinach Contact Campaign to increase the number of pawns | पटसंख्या वाढविण्यासाठी यंदाही पालक संपर्क अभियान

पटसंख्या वाढविण्यासाठी यंदाही पालक संपर्क अभियान

२५ ला प्रारंभ : आरटीईअंतर्गत आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
वर्धा : शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी मागील वर्षी जिल्हा परिषद शाळांमधील रोडावत चाललेली पटसंख्या वाढविण्यासाठी पालक संपर्क अभियान राबविले होते. या अभियानाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. पुन्हा याच धर्तीवर हे अभियान यंदाही राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे, अशी माहिती जि.प. शिक्षण सभापती वसंत आंबटकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
या अभियानाला येत्या २५ एप्रिलला समुद्रपूर पंचायत समिती येथून प्रारंभ करण्यात येणार असून ३० एप्रिलपर्यंत ते चालणार आहे. या अभियानांतर्गत पालकांना जिल्हा परिषद शाळांचे वैशिष्ट्ये समजावून आपल्या पाल्यांचा जिल्हा परिषदेच्या शाळेतच प्रवेश घ्यावा, असा विनंतीवजा आग्रह करणार असल्याचेही आंबटकर म्हणाले.
अभियान राबविताना शैक्षणिक व्यावसायिक पात्रता असलेले शिक्षक, संगणकीकृत शाळा, डिजिटल शाळा, इ-लर्निंग शाळा, मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध, उपस्थिती भत्तावाटप योजना, शिष्यवृत्ती योजना, क्रीडांगणाची सोय, स्वच्छ-शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, बोलक्या भिंती असलेल्या वर्ग खोल्या व शाळा, ज्ञानरचनावादानुसार अध्यापन, कृतीयुक्त अध्यापन पद्धतीवर आधारीत अध्यापन या बाबी पालकांना समजावून सांगणार असल्याची माहितीही आंबटकर यांनी यावेळी दिली. यावेळी समाजकल्याण सभापती वसंत पाचोडे, जि.प. सदस्य मिलिंद भेंडे, किशोर चौधरी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Spinach Contact Campaign to increase the number of pawns