So take action on the 'that' dairy and sales team | तर ‘त्या’ डेअरी आणि विक्री संघावर कारवाई करा

तर ‘त्या’ डेअरी आणि विक्री संघावर कारवाई करा

ठळक मुद्देसुनील केदार : जिल्हाधिकारी कार्यालयात कारोनासंदर्भात घेतली आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या जिल्ह्यात होऊ नये यासाठी इतर जिल्हा व राज्यातून वर्धा जिल्ह्यात आलेल्या व्यक्तीची माहिती २४ तासात जमा केली गेली पाहिजे. त्यांना तात्काळ विलगीकरणाच्या सूचना देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवावे. तसेच भाजी बाजार बंद करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि पशुपालकांकडून दूध घेण्यास नकार देण्याऱ्या मोठ्या दूध डेअरी आणि विक्री संघावर कारवाई करावी, असे आदेश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिलेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सुनील केदार यांनी कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे उपस्थित होत्या.
राष्ट्रीय आपत्ती आणि साथरोग प्रतिबंध कायद्यांतर्गत जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत करणे ही शासन, प्रशासनाची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीचा गैरफायदा घेऊन बाजार समित्या, डेअरी, दूध विक्री संघ हे शेतकऱ्यांकडून भाजी आणि दूध घेण्यास नकार देत असतील आणि त्यामुळे टंचाई परिस्थिती निर्माण होत असेल तर अशा समित्या आणि संघावर जिल्हाधिकारी यांनी तत्काळ कारवाई करावी. जीवनावश्यक वस्तू दुकानांच्या व्यतिरिक्त सुरू राहणाºया इतर दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंचा साठा आणि भविष्यातील अडचणी याचाही आढावा घेतला.

लॉकडाऊनमधून यांना वगळण्यात आले
जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाºया कंपन्यांना शासनाने लॉकडाऊन मधून वगळले आहे. तसेच शेतीची कामे सुद्धा यातून वगळण्यात आली आहेत. पशुखाद्य दुकाने सुरू ठेवण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. तसेच याची वाहतूक करणाºया वाहतुकदारांना सुद्धा लॉकडाऊन मधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी.

जनजागृतीकरिता सामाजिक संस्थांचा सहभाग घ्या
कोरोना विषाणूचे संक्रमण जास्त वाढू नये म्हणून शासनाने संचार बंदी लागू केली आहे. संचारबंदीचा उद्देश लोकांना समजून सांगा. जनतेमध्ये कोरोना विषाणूबाबत जनजागृती करा. नागरिकांनी स्वत:हून संचारबंदी लावून घेतली तर पोलिसांचा ताण कमी होईल. याकामी सामाजिक संस्थांचा सहभाग घ्या. असेही पालकमंत्री यांनी सांगितले.

दोन महिने पुरेल इतका धान्यसाठा उपलब्ध
जिल्ह्यात अन्नधान्यसाठा पुढील दोन महिने पुरेल एवढा असून अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात मुबलक साठा आहे . तेलाचे उत्पादन करणाऱ्या आॅइल मील मालकाशी चर्चा करण्यात येत आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून साखर येत आहे. त्यामुळे तेथील जिल्हाधिकारी यांच्याशी वारंवार संपर्क साधल्या जात असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिली.

जिल्ह्यात एकही कोरणाबाधित नाहीत
जिल्ह्यात सध्या एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. पण प्रशासन अलर्ट आहे. अलगिकरण कक्ष तयार आहेत. मास्क, सॅनिटायझर, औषधी यांचे पुरवठा आदेश देण्यात आले असून एक, दोन दिवसात आपल्याकडे त्याचा मुबलक साठा असेल. तसेच नर्सेस आणि डॉक्टरांचे प्रशिक्षणही घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Web Title: So take action on the 'that' dairy and sales team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.