The remaining farmland is closed for eight days | उरलेल्या शेतजमिनीच्या वहिवाटीचा मार्ग आठ दिवसांपासून बंद
उरलेल्या शेतजमिनीच्या वहिवाटीचा मार्ग आठ दिवसांपासून बंद

ठळक मुद्देनिंबोली (शेंडे) गावातील प्रकार : वहिवाटीकरिता पक्के रस्ते बांधून देण्याची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : तालुक्यातील निम्न वर्धा बुडीत क्षेत्रात गेलेल्या निंबोली (शेंडे) या गावातील ४८ टक्के जमीन निम्न वर्धा क्षेत्राच्या बुडीत क्षेत्रात गेली आहे, तर ५२ टक्के जमीन अद्याप शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. या उर्वरित ५२ टक्के शेतजमिनीवर जाण्यासाठी निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी असल्याने उरलेल्या शेतजमिनीवर जाण्यासाठी वहिवाटीचे मार्गही पाण्याखाली आलेत. त्यामुळे उरलेली जमीनही पडीक राहण्याची भीती या बॅकवॉटरच्या पाण्याने निर्माण झाली आहे.
मागील आठ दिवसांपासून निंबोली गावचे वहिवाटीचे मार्ग बंद झाले आहेत. गावाभोवताल पाण्याचा वेढा असल्याने आजूबाजूच्या व निम्न वर्धाने संपादित केलेल्या जमिनीला सध्या तलावाचे आले आहे. पाण्यामुळे घरांना ओलावा सुटला असून पाझरत आहे. गावालगतच वर्धा नदी सध्या तुडूंब भरून आहे. या बॅकवॉटरच्या पाण्यामुळे निंबोली (शेंडे) गावातील उर्वरित शेतजमिनीवर जाणारे वहिवाटीचे सर्व मार्ग या बॅकवॉटरच्या पाण्याने बंद झाले आहेत.
आतापर्यंत निम्न वर्धा प्रकल्पाने बाधीत शेतजमिनीवर पाणीसाठा झाला नव्हता. यावर्षी प्रथमच पंधरा वर्षांनंतर निम्न वर्धा बाधीत जमिनीवर पाणी आल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील महिन्यात संबंधित विभागाने प्रकल्पबाधीत गावात दवंडी देऊन पाणीसाठा करणार असल्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु शेतकऱ्यांनी शेतजमिनीवर दरवर्षीप्रमाणे सोयाबीन, तूर, कपाशी पिकाची लागवड केली होती. त्या सर्व शेतजमिनीवर तीन ते चार फूट पाणी आहे. प्रकल्पबाधीत निंबोली, वागदा, वाठोडा, सर्कसपूर, अहिरवाडा, इठलापूर, राजापूर आदी गावातील ७० ते ८० हेक्टर शेतजमिनीवर पाणी येऊन थांबल्याने शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. तर निंबोली गावातील उरलेल्या २५ शेतकºयांच्या ५२ टक्के उरलेल्या शेतजमिनीवर जाण्यासाठी वहिवाटीच्या मार्गावर सर्वत्र निम्न वर्धा धरणाचे बॅकवॉटरचे पाणी आल्याने वहिवाट बंद झाली आहे. दरम्यान या बॅकवॉटरच्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वºहाडे यांनी भेट दिली. आणखी एक मीटरच्या वर पाणीसाठा करणार नाही व पाणी उतरल्यावर निंबोली (शेंडे) गावातील उरलेल्या शेतजमिनीवर जाण्यासाठी पक्क्या रस्त्यांचे मार्ग बांधून देण्याचे आश्वासन निंबोली येथील प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांना दिले.
निम्न वर्धाच्या बॅकवॉटरचा नांदपूर या गावालाही दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटका बसतो. डॅमचे पाणी निंबोली व पुनर्वसित गावात थांबून असून धरणाचे ३१ गेट उघडूनही पाणी जैसे थे आहे. वहिवाटीकरिता रस्ते बांधून देण्याचे आश्वासन मिळाले; मात्र पाणी थांबून असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

वर्धा नदीच्या पाणीसाठ्यातही वाढ
निम्न वर्धा धरणाच्या पाणीसाठ्यामुळे आर्वी, अमरावती मार्गावरच्या देऊरवाडा, कौंडण्यपूर येथील वर्धा नदीच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या मार्गावरच्या पुलाच्या फक्त चार ते पाच फुट पाणी खाली असल्याने वर्धा नदीचे पात्र अथांग पाण्याने भरले आहे. या बॅकवॉटर पाण्याचा नांदपूर या गावालाही दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटका बसतो.

मागील आठ दिवसांपासून निम्न वर्धा धरणाचे बॅक वॉटरचे पाणी शेतात साचलेले आहे. त्यामुळे वहिवाटीचे मार्ग बंद झाले आहेत. संबंधित विभागाने वहिवाटीकरिता रस्ते बांधून देण्याचे आश्वासन दिले.
- सुधीर शेंडे, शेतकरी, निंबोली (शेंडे).

Web Title: The remaining farmland is closed for eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.