पिपरीत तीन दिवस राहणार ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:00 AM2020-07-09T05:00:00+5:302020-07-09T05:00:11+5:30

विवाहानंतर परिसराला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, ५ जुलैला त्याला त्रास व्हायला लागल्याने प्रथम कारला चौकातील एका खासगी रुग्णालयात दाखविण्यात आले. त्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करुन त्याचे स्वॅब तपासणीकरिता पाठविले. आज बुधवारी त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रशासनाने पिपरी परिसरात धाव घेऊन विवाह काळापासूनचा इतिहास जाणून घेतला.

People's curfew in Pipri for three days | पिपरीत तीन दिवस राहणार ‘जनता कर्फ्यू’

पिपरीत तीन दिवस राहणार ‘जनता कर्फ्यू’

Next
ठळक मुद्देउपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश : नवरदेवाने वाढविल्या नातेवाईकांसह मित्रमंडळींच्या अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरालगतच्या पिपरी (मेघे) परिसरात विवाहानंतर गृह विलगीकरणात असलेला नवरदेव बुधवारी सकाळी कोरोनाबाधित आढळून आला आहे. प्रवासाचा कोणताही इतिहास नसणारा व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने ‘अ‍ॅक्शन मोड’ वर उपायायोजना राबवायला सुरुवात केली. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला असता हायरिक्समध्ये असणाऱ्यांची संख्या बरीच असल्यामुळे पिपरी (मेघे) ग्रामपंचायतचा परिसरात बुधवारपासून शुक्रवारपर्यंत तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा प्रशासनाकडून विवाहाकरिता शर्ती व अटींच्या अधीन राहून परवानगी दिली जाते. पण, परवानगीधारक नियमांचे उल्लघन करित असल्याने पिपरीतील प्रकारावरुन प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. पिपरीच्या वॉर्ड क्रमांक ४ मधील युवकाचा ३० जूनला वर्ध्यातच विवाह झाला.
विवाहानंतर परिसराला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, ५ जुलैला त्याला त्रास व्हायला लागल्याने प्रथम कारला चौकातील एका खासगी रुग्णालयात दाखविण्यात आले. त्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करुन त्याचे स्वॅब तपासणीकरिता पाठविले. आज बुधवारी त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रशासनाने पिपरी परिसरात धाव घेऊन विवाह काळापासूनचा इतिहास जाणून घेतला. त्यांच्या या विवाहाकरिता अमरावती या कोरोनाबाधित जिल्ह्यातून २९ जूनला नातेवाईक आले होते. विवाह सोहळ्याची फोटोग्राफी व व्हिडिओ शुटींग करणारे व्यक्तीही अमरावतीचे होते.
विशेषत: कोणतीही परवानगी न घेता वरमंडपी तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हळदीच्या व सत्यनारायणाच्या कार्यक्रमालाही २५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आले होते. इतकेच नाही तर विवाहाच्या तीन दिवसापूर्वी केलेल्या कंदुरीच्या कार्यक्रमाला वर्धा, पिपरी परिसरातील मित्र मंडळी, नातेवाईक असे दोनशेच्या आसपास व्यक्ती उपस्थित होते, अशी माहिती आरोग्य विभाग व पोलिसांच्या चौकशीत पुढे आली आहे. त्यामुळे प्रशासनाने त्या सर्व व्यक्तींचा शोध सुरु केला आहे. हाय रिक्समध्ये ३० ते ३५ तर लो रिक्समध्ये ७० ते ८० व्यक्ती येण्याची शक्यता असून त्यांचा आरोग्य विभाग शोध घेत आहे. हायरिक्समधील २५ व्यक्तींना आयसोलशनमध्ये दाखल करण्यात आले असून त्या सर्वाचे स्वॅब तपासणीकरिता पाठविले जाणार आहेत.
शुक्रवारपर्यंत पिपरी ग्रामपंचायतीचा संपूर्ण परिसर बंद राहणार असून अत्यावश्यक सेवा आणि औषधींची दुकानेच सुरु राहणार असल्याचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्वाती ईसाये व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिघिकर उपस्थित होत्या.

पहिल्यांदाच एका रुग्णांसाठी दोन कंटेन्मेंट झोन
वॉर्ड क्रमांक ४ मधील शिवरामवाडीत राहणाºया ३३ वर्षीय युवकाचा लगतच्याच वॉर्ड क्रमांक ५ मधील नंदनवननगरातील मुलीशी विवाह झाला. त्यांचा विवाहसोहळा पिपरीतील सभागृहामध्ये झाला. तसेच तो परिसरातीलच खासगी रुग्णालयात गेला होता. त्यामुळे सर्व प्रकार हा एकाच परिसरात घडल्याने प्रशासनाने शिवरामवाडी आणि नंदनवन नगरातील परिसर कंटेन्मेट झोनमध्ये टाकला आहे.

मंगल कार्यालयाच्या संचालकावरही कारवाई
मंगलकार्यालयाच्या संचालकांना नियम व अटींच्या अधीन राहून ५० व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह सोहळे आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. तसेच सोशल डिस्टंन्सिंग, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही मंगल कार्यालय संचालकांवर निश्चित केली आहे. पण, वैदिक विवाह मंडळाच्या सभागृहात या विवाह सोहळ्याला ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्याने दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

आप्तस्वकीयांवरही कारवाईची टांगती तलवार
वर-वधूकडे हळदीचा, सत्यनारायणाचा तसेच कंदुरी सारखे कार्यक्रम विनापरवानगी करुन मोठ्या प्रमाणात व्यक्ती एकत्र जमत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. याही विवाह सोहळ्याला कोरोनाबाधित जिल्ह्यातील नातेवाईकांसह वर्धा शहर आणि आजुबाजूच्या परिसरातील मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले होते. त्यामुळे त्यांचाही शोध सुरु केला असून त्या सर्वांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
आता विवाह करणे सोपे नाही...
पूर्वी विवाहाच्या परवानगीकरिता परिवारातील पाच ते सहा सदस्यांचे आधार कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र जोडले की परवानगी मिळायची. मात्र, आता पन्नास व्यक्तींची नावे, त्यांचे आधार कार्ड तसेच त्या सर्वांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडल्यानंतरच परवानगी मिळणार आहे. त्यामुळे आता पिपरीतील नवरदेवामुळे अनेक विवाहोत्सुकांच्या आता अडचणी वाढणार आहे.

विवाहाला जाल तर क्वारंटाईन व्हाल
जिल्ह्यातील व्यक्तीचा विवाह बाहेर जिल्ह्यातील व्यक्तीसोबत झाला. आणि वधू-वरासह वºहाडी आपल्या जिल्ह्यात परत आले तर त्यांना १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. सोबतच आपल्या जिल्ह्यात आल्यानंतर आयोजित कार्यक्रमालाही सहभागी होणाºया व्यक्तींना क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यामुळे आता विवाहासह इतर कार्यक्रमांनाही सहभागी होत असतांना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.
विवाहस्थळी राहणार पथक
प्रशासनाकडून परवानगी घेत प्रत्यक्ष विवाहस्थळी उपस्थिती मोठ्या प्रमाणात राहतात. हे प्रशासनाच्या लक्षात आल्याने अशांवर वचक निर्माण करुन कोरोनाचा प्रकोप टाळण्यासाठी आता विवाह मंडपी प्रशासनाकडून तीन व्यक्तीचे पथक तैनात केले जाणार आहे. यामध्ये नगरपालिका, ग्रामपंचायत, महसूल विभाग, पोलीस विभाग व आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांचा समावेश असणार आहेत.
 

Web Title: People's curfew in Pipri for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.