‘डेंग्यू’ व ‘स्वाईन फ्लू’ आजारांबाबत जनजागृती करा

By Admin | Updated: October 16, 2015 03:00 IST2015-10-16T03:00:37+5:302015-10-16T03:00:37+5:30

सध्या डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू आजाराने मोठ्या प्रमाणात रुग्ण बाधित होत आहेत. डेंग्यू हा आजार एडिस इजिप्टाय या डासांपासून होतो. तो विषाणूमुळे होणारा आजार आहे.

Make awareness about 'dengue' and 'swine flu' diseases | ‘डेंग्यू’ व ‘स्वाईन फ्लू’ आजारांबाबत जनजागृती करा

‘डेंग्यू’ व ‘स्वाईन फ्लू’ आजारांबाबत जनजागृती करा

जिल्हा आरोग्य अधिकारी : नवदुर्गा उत्सव मंडळांना फलक, बॅनर लावण्याच्या सूचना
वर्धा : सध्या डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू आजाराने मोठ्या प्रमाणात रुग्ण बाधित होत आहेत. डेंग्यू हा आजार एडिस इजिप्टाय या डासांपासून होतो. तो विषाणूमुळे होणारा आजार आहे. डेंग्यू तापाच्या रुग्णाला उपचारास विलंब झाला तर मृत्यू ओढविण्याची शक्यता असते. यामुळे नागरिकांनी वेळीच उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व नवदुर्गा उत्सव मंडळांनी सामाजिक बांधिलकी म्हणून डेंग्यू व स्वाईन फ्ल्यू या आजारांची जनजागृती होईल, असे बॅनर, पोस्टर्स लावावे. हस्तपत्रिका छापून जनजागृती कराव्या, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.जी. चव्हाण यांनी दिल्यात.
जिल्ह्यात सध्या डेंग्यू व स्वाईन फ्लू आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे जरजागृती गरजेची झाली आहे. या आजाराची लक्षणे दिसताच नजीकच्या रुग्णालयात उपचार घेतले पाहिजे. डासांच्या अळ्या नष्ट करा, पाण्याची भांडी आठवड्यातून एकदा घासून कोरडी करा. पाण्याचे डबके साचू देऊ नका. मच्छरदाणीचा वापर करावा, डेंग्यू आजारावर प्रतिबंधात्मक उपाय हाच एकमेव पर्याय असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
स्वाईन फ्लू हा आजार एच.१, एन.१ या विषाणूमुळे होतो. याची लक्षणे ताप, घसादुखी वा घशाला खवखव होणे, नाक गळणे, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, क्वचित प्रसंगी उलटी व जुलाब होणे आदी आहेत. लहान बालके, ६५ वर्षांवरील व्यक्ती, गरोदर महिला, हृदयविकार व मूत्रपिंडाचे आजार, मधुमेह, उच्चरक्तदाब आदी आजार असलेल्या व्यक्ती या आजारासाठी अतिजोखमीचे ठरतात. त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. स्वाईन फ्ल्यूची लागण टाळण्यासाठी वारंवार साबणाने व स्वच्छ पाण्याने हात धुवावे. पौष्टीक व सकस आहार घ्यावा. गरम पाण्यात मीठ व हळद टाकून गुळण्या कराव्यात. भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी. शिंकताना वा खोकलताना नाका तोंडावर रूमाल धरावा. या आजारांपासून दूर राहण्यासाठी धुम्रपान करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, खोकला, सर्दी व ताप असताना गर्दीच्या ठिकाणी जाणे तसेच डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे टाळावे, असे आवाहनही डॉ. चव्हाण यांनी केले आहे. नवरात्री उत्सवात लंगरकरिता उपयोगात आणलेले प्लास्टिक द्रोण, प्लेट नष्ट कराव्या व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Make awareness about 'dengue' and 'swine flu' diseases