कोविड बाधितांना ठेवले जातेय स्वगृही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 05:00 AM2020-09-17T05:00:00+5:302020-09-17T05:00:11+5:30

संशयीताची आरटीपीसीआर किंवा अ‍ॅन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी केली जाते. त्याचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह येताच पूर्वी लक्षणविरहित कोविड बाधिताला थेट कोविड रुग्णालयात नेल्या जात असे. मात्र, आता लक्षणविरहित कोविड बाधिताला थेट कोविड केअर सेंटर मध्ये नेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

Kovid is kept at home for the affected | कोविड बाधितांना ठेवले जातेय स्वगृही

कोविड बाधितांना ठेवले जातेय स्वगृही

Next
ठळक मुद्देसावधान : गृहअलगीकरणातील लक्षणविरहित ११५ रुग्णांवर आरोग्य यंत्रणेची करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासह कोविड बाधित गंभीर रुग्णांना वेळीच चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता नवीन रणनीती आखली आहे. या रणनीती नुसार लक्षणविरहित कोविड बाधितांना काही अटी व शर्तींवर गृहअलगीकरणात ठेवले जात आहे. सध्या ११५ लक्षणविरहित कोविड बाधित गृहअलगीकरणात असून त्यांच्यावर आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी करडी नजर ठेऊन आहेत.
प्राप्त माहितीनुसार, संशयीताची आरटीपीसीआर किंवा अ‍ॅन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी केली जाते. त्याचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह येताच पूर्वी लक्षणविरहित कोविड बाधिताला थेट कोविड रुग्णालयात नेल्या जात असे. मात्र, आता लक्षणविरहित कोविड बाधिताला थेट कोविड केअर सेंटर मध्ये नेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या सेंटरमध्ये लक्षणे नसलेली, किरकोळ लक्षणे असलेली तसेच गंभीर रुग्ण अशी कोविड बाधितांची वर्गवारी ठरवून त्यांना पुढील उपचारासाठी कोविड रुग्णालय किंवा कोविड केअर सेंटर तसेच रुग्णांच्या घरी विशेष सुविधा असल्यास अलगीकरणात ठेवले जात आहे.
कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या आणि कोरोनाची लक्षणे नसलेल्या एखाद्या कोविड बाधिताला कोविड केअर सेंटरपेक्षा गृहअलगीकरणात राहायची इच्छा असल्यास त्या कोविड बाधिताकडून स्वयंघोषणापत्र लिहून घेत काही अटी व शर्तींवर त्यांना गृह अलगीकरणात राहण्याची परवागी दिली जात आहे. सध्या स्थितीत लक्षणविरहित ११५ कोविड बाधितांना गृहअलगीकरणात राहण्याची परवागीन देण्यात आली आहे. शिवाय त्यांना त्यांच्या स्वगृही पाठविण्यात आले आहे. असे असले तरी या कोविड बाधितांवर आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांसह कोविड योद्धा म्हणून काम करणाºया जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी करडी नजर ठेऊन आहेत.

अशी आहे प्रक्रिया
एखाद्या लक्षणविरहित कोविड बाधिताने स्वयंघोषणापत्र लिहून दिल्यावर कोविड केअर सेंटरमधील वैद्यकीय अधिकारी त्यांचे त्या कोविड बाधिताच्या आरोग्या विषयीचे मत ठरलेल्या नमुना अर्जात नमुद करून ते आरोग्य यंत्रणेच्या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर पाठवितो. त्यानंतर संबंधित तालुका वैद्यकीय अधिकारी त्या कोविड बाधित व्यक्तीच्या घरी जावून कोविड बाधिताने स्वयंघोषणापत्रात नमुद केलेली माहिती खरी आहे काय तसेच डब्लूएचओच्या सूचनांना अनुसरून कोविड बाधिताच्या घरी खबरदारीच्या आवश्यक सोई-सुविधा आहे काय, याचीही शहानिशा करून आपला अहवाल वरिष्ठांकडे सादर करतो. सर्व काही उत्तम असल्यास त्या लक्षणविरहित कोरोना बाधिताला १४ दिवस गृहअलगीकरणात राहण्यासाठी परवागी दिली जात असल्याचे सांगण्यात आले.

अन्यथा होईल फौजदारी कारवाई
लक्षणविरहित कोविड बाधिताने गृहअलगीकरणासाठी विनंती करताना भरून दिलेल्या स्वयंघोषणापत्रातील माहिती खोटी आढळल्यास त्या कोविड बाधिताला फौजदारी कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते. असे असले तरी आतापर्यंत अशा कुठल्याही लक्षणविरहित कोविड बाधितावर आरोग्य विभागाने फौजदारी कारवाई केलेली नाही.
जिल्ह्यात नऊ कोविड केअर सेंटर
कोविड रुग्णालयांवर अचानक ताण वाढू नये म्हणून जिल्ह्यात नऊ ठिकाणी कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. शिवाय तेथे १ हजार ११० रुग्णखाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांवरील ताण कमी व्हावा तसेच गंभीर कोविड बाधिताला वेळीच चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्हाधिकाºयांच्या सूचनेवरून लक्षणविरहित कोविड बाधितांना आता काही अटी व शर्तींवर गृहअलगीकरणात ठेवण्यात येत आहेत. सध्या ११५ लक्षणविरहित कोविड बाधित गृहअलगीकरणात आहेत. शिवाय त्यांच्यावर आरोग्य विभाग करडी नजर ठेऊन आहे.
- डॉ. अनुपम हिवलेकर, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

Web Title: Kovid is kept at home for the affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.