मातोश्री वृद्धाश्रमातील १८६ वृद्धांची आरोग्य तपासणी

By Admin | Updated: December 21, 2015 02:25 IST2015-12-21T02:25:42+5:302015-12-21T02:25:42+5:30

सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुविज्ञान संस्थेच्या नागरी आरोग्य केंद्राद्वारे मातोश्री वृद्धाश्रम येथे ज्येष्ठ नागरिक मेळावा घेण्यात आला.

Health check-up of 186 elderly people of Matoshri | मातोश्री वृद्धाश्रमातील १८६ वृद्धांची आरोग्य तपासणी

मातोश्री वृद्धाश्रमातील १८६ वृद्धांची आरोग्य तपासणी

ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा : सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालयाच्या नागरी आरोग्य केंद्राचा उपक्रम
वर्धा : सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुविज्ञान संस्थेच्या नागरी आरोग्य केंद्राद्वारे मातोश्री वृद्धाश्रम येथे ज्येष्ठ नागरिक मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला सुमारे २६० ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १८६ वृद्धांच्या आरोग्याची तपासणी केली. शिवाय आवश्यक त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरूवात महात्मा गांधी व डॉ. सुशिला नायर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकातून आरोग्य केंद्राचे प्रभारी प्रमोद बहुलेकर यांनी डॉ. सुशिला नायर यांच्या कार्याची माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे पाहण्याची गरज का आहे, हे सांगताना आपली सरासरी आयुर्मर्यादा १९५१ मध्ये केवळ ४२ वर्षे होती. ती आता ६८ वर्षांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. आपल्या संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मानाचे स्थान दिले जात असे. सरकारने ज्येष्ठ नागरिकांची देखभाल व कल्याणासाठी अनेक कायदे केले आहेत; पण केवळ कायदे बनवल्याने समस्या सुटणार नाही, असे सांगितले.
आधारवडचे अध्यक्ष श्यामकांत देशपांडे यांनी हिवाळी अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या संबंधाने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. मातोश्री वृद्धाश्रमाच्या अध्यक्ष देशमुख यांनी वृद्धाश्रमाची तसेच समाजाच्या हिताकरिता संस्काराची गरज का आहे, हे पटवून दिले. याप्रसंगी सिंदी मेघेच्या सरपंच सुषमा येसनकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. अश्विनी कलंत्री यांनी उच्च रक्तदाबाची कारणे व उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले.
मेळाव्यात आयसीएमआर प्रकल्पाच्या कार्यकर्र्त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व त्यांचे निराकरण यावर आधारीत ‘कुटुंबाचा आधार’ ही नाटिका सादर केली. सिंदी मेघेच्या एका बचत गटाने वृद्धांच्या समस्या मांडल्या. शिवाय पपेट शोही सादर करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन अलका खेडकर यांनी केले तर आभार अतुल कातरकर यांनी मानले. मेळाव्याला प्रभाकर डोरले, विद्या शेंडे, शोभा खांदेतोड, रोटा तसेच आयसीएमआर प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Health check-up of 186 elderly people of Matoshri