नेमेचि पोपटांचा थवा येई आमच्या घरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 06:00 AM2019-08-25T06:00:00+5:302019-08-25T06:00:20+5:30

घरचे निसर्गरम्य वातावरण आणि पक्ष्यांप्रती असलेला जिव्हाळा यामुळे मागील तीन वर्षांपासून त्यांच्या घरी पोपटांची नित्यनेमाने शाळा भरत आहे. वर्षभर दिसेनासे होणारे हे पोपट जुलै महिन्यात क्षीरसागर यांच्या घरी येतात आणि ऑगस्ट महिना संपेपर्यंत मुक्कामी राहतात.

A flock of parrots came to our house | नेमेचि पोपटांचा थवा येई आमच्या घरा

नेमेचि पोपटांचा थवा येई आमच्या घरा

Next
ठळक मुद्देदोन महिने असतो मुक्काम । क्षीरसागर परिवार करतोय सरबराई

आनंद इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विकासाच्या झंझावातात शहरात सिमेंटची जंगले उभी राहिल्याने पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. त्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट, पक्ष्यांची शाळा कालौघात नामषेश होताना दिसत आहे. अशाही परिस्थितीत वर्ध्यातील क्षीरसागर परिवाराचा पोपटांशी लळा लागला आणि जे घडले ते नवलच. त्यांच्या घरी दररोज एक-दोन नव्हे तर तब्बल दोनशे-तीनशे पोपट गोळा होतात. या पोपटांची येथे तास दोन तास शाळा भरते आणि सुरू होतो त्यांचा किलबिलाट. त्यांच्या या सुमधूर आवाजाने अख्खा परिसर प्रसन्न होऊन जातो. दररोज नागरिकही हा किलबिलाट ऐकण्यासाठी आतुर झालेले असतात.
प्रफुल्ल महादेवराव क्षीरसागर, असे या पक्षीप्रेमी गृहस्थाचे नाव आहे. त्यांचे कारला रोड परिसरातील सुदर्शननगरात घर आहे. घरात जवळपास ८०० चौरस फुटांमध्ये बगीचा तयार केला असून त्यात विविध फुलझाडांसह आंब्याचीही झाडे आहेत. घरचे निसर्गरम्य वातावरण आणि पक्ष्यांप्रती असलेला जिव्हाळा यामुळे मागील तीन वर्षांपासून त्यांच्या घरी पोपटांची नित्यनेमाने शाळा भरत आहे. वर्षभर दिसेनासे होणारे हे पोपट जुलै महिन्यात क्षीरसागर यांच्या घरी येतात आणि ऑगस्ट महिना संपेपर्यंत मुक्कामी राहतात. दररोज सकाळी पावणे सहा वाजतापासून पोपटांचे आगमन सुरु होते. हळूहळू दहा ते पंधरा मिनिटात दोनशे ते तीनशे पोपट त्यांच्या अंगणात अवतरतात. क्षीरसागर परिवारही या पोपटांसाठी अंगणात खाद्य व पाण्याची व्यवस्था करीत असल्याने दीड ते दोन तास त्यांचा किलबिलाट चालतो. क्षीरसागर यांच्या परिवारातील सर्व सदस्यांशी या पोपटांचा इतका लळा लागला की, सर्व पोपट त्यांच्या अवतीभवती, अंगणात, सुरक्षा भिंतीवर आणि गेटवर गर्दी करून बसतात. मग, पाऊस असो वा ऊन या पोपटांची हजेरी नियमित लागत असल्याने परिसरातील नागरिकांनाही आता पोपटांचे मनोहारी दृश्य आणि सुमधुर आवाजाने भुरळ घातली आहे.

सकाळी सहा वाजताच पोपटांच्या घराभोवती घिरट्या सुरू होतात. त्यामुळे प्रफुल्ल क्षीरसागर यांच्यासह त्यांची पत्नी ज्योती, मुलगा हिमांशु व मुलगी रुपल हे सर्व सदस्य पोपटांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी धडपडतात. दररोज अंगणात तांदूळ व पाण्याची सोय केली जाते. तांदळाची व पाण्याची सोय केल्यानंतर क्षीरसागर परिवारातील सदस्य पोर्चमध्ये लावलेली बेल वाजतात. बेलचा आवाज ऐकून पोपटांची गर्दी होते. आजूबाजूला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चाहूल लागली की, सर्व उडून जातात. पुन्हा लगेच येऊन दाणे टिपतात.

Web Title: A flock of parrots came to our house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.