१२ हजार शिक्षक आपापल्या जिल्ह्यात परतणार; आंतरजिल्हा बदलीसाठी हालचाली सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 12:37 IST2026-01-12T12:34:34+5:302026-01-12T12:37:08+5:30
Vardha : गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

12,000 teachers will return to their respective districts; Movement for inter-district transfers begins
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ग्रामविकास विभागाने याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे जवळपास १२ हजार शिक्षकांना आपापल्या जिल्ह्यात बदलीने जाता येणार आहे.
आता ग्रामविकास विभाग सक्रिय झाला आहे. विभागाने आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सातवा टप्पा सुरू करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत प्रधान सचिवांनी ६ जानेवारीला सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची व्हीसीद्वारे बैठक घेउन सूचना दिल्या आहेत. आंतरजिल्हा बदलीचा सातवा टप्पा कार्यान्वित करण्यापूर्वी जिल्हा परिषदांना शिक्षक संवर्गाचे रोस्टर अद्ययावत करण्याच्या कालमर्यादित सूचना द्याव्या, जिल्ह्यात पेसा क्षेत्रात २०, तर बिगर पेसा क्षेत्रात ८० टक्के रिक्त पदे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेकरिता उपलब्ध करून द्यावी, आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना आरक्षित पदांवर उमेदवार उपलब्ध न झाल्यास ती पदे शिक्षक भरतीप्रमाणे खुल्या प्रवर्गाकरिता परावर्तित करावी, ३१ मे २०२६ अखेरपर्यंतची रिक्त पदे गृहीत धरावी, बदलीकरिता स्वतंत्र वेळापत्रक निर्गमित करावे, ही प्रक्रिया शिक्षक भरतीपूर्वी राबवावी, आदी मागण्या शिक्षक संघटनांनी केल्या होत्या.
३१ मेपर्यंत पदे भरणार
प्रहार शिक्षक संघटनेने याबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, शिक्षणमंत्री दादा भुसे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांना निवेदन दिले होते. त्यामुळे आता आंतरजिल्हा बदली प्रक्रियेकरिता कार्यवाही सुरू झाली आहे. संचमान्यता पूर्ण होताच ३१ मे अखेरपर्यंतची रिक्त पदे प्रथम आंतरजिल्हा बदलीकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नंतर शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आहे.
नवीन संचमान्यता २०२५-२६ नुसार जिल्हा परिषदेत जवळपास सहा हजार रिक्त जागा आहे. दुसरीकडे दोन हजार अतिरिक्त शिक्षक आहेत. ३१ मे २०२६ रोजीची संभाव्य रिक्त पदे गृहीत धरून पवित्र पोर्टलवर जिल्हा परिषदेच्या जाहिराती आंतरजिल्हा बदलीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आहे.
"आंतरजिल्हा बदलीचा सातवा टप्पा पूर्ण होताच जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेला सुरुवात होईल. प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले आहे. शासनाने आंतरजिल्हा बदलीबाबत कार्यवाही सुरू केल्याने प्रतीक्षेतील १२ हजारांवर शिक्षकांना न्याय मिळणार आहे."
- महेश ठाकरे, राज्याध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना.