उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे बूट फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. रविवारी रात्री ८ च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. त्यात फॅक्टरीत असणारे केमिकल आणि चमडे यामुळे आग आणखी भडकली. पाहता पाहता ६ मजली इमारत आगीच्या विळख्यात अडकली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले परंतु या आगीत ५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
ही बूट फॅक्टरी कानपूरच्या प्रेमनगर भागातील रहिवासी परिसरात होती. अली नावाच्या व्यक्तीने लोकवस्तीत फॅक्टरी उभारली होती. ही फॅक्टरी घराच्या बेसमेंटमध्ये सुरू होती तर वरच्या मजल्यावर दानिश आणि कासिम यांचे कुटुंब वास्तव्यास होते. कासिम यांचे कुटुंब बाहेर जेवायला गेले होते तर दानिश यांची पत्नी आणि ३ मुले घरीच होते. रात्री ८ वाजता शॉर्ट सर्किटमुळे बूट फॅक्टरीत आग लागली. या आगीत फॅक्टरी ठेवलेले केमिकल आणि सिलेंडरचा स्फोट झाला. आग जास्तच भडकल्याने प्रेमनगर भागात गोंधळ उडाला. आग ग्राऊंड फ्लोअरला पोहचली तेव्हा दानिश त्याच्या पत्नी आणि मुलांना वाचवण्यासाठी घरात गेला परंतु आगीत हे सर्व अडकले.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १२ बंब घटनास्थळी पोहचले त्यांनी खबरदारी म्हणून आसपासच्या घरातील लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. परिसरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. रात्रभर बूट फॅक्टरीतील आग धुमसत राहिली. फॅक्टरीत केमिकल असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात फायर ब्रिगेड टीमला अथक प्रयत्न करावे लागले. पहाटे साडे पाचच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळाले. आगीमुळे सर्वत्र धुराचं साम्राज्य निर्माण झाले होते.
या आगीत दानिश, त्याची पत्नी आणि ३ मुलांचा होरपळून मृत्यू झाला. त्याशिवाय मुलांना शिकवण्यासाठी आलेले ट्यूशन टीचरही आगीत मृत्युमुखी पडले. NDRF च्या टीमने जळालेले मृतदेह बाहेर काढून पोस्टमोर्टमला पाठवले. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार, महापौर यांच्यासह विविध राजकीय नेते घटनास्थळी पोहचले.