उत्तर प्रदेशातील कन्नौजमधून एक खळबळजनक घटना समोर आली. मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या महिलेची धारदार शस्त्राने हत्या करून तिचा मृतदेह शेतात फेकून देण्यात आला. महिलेचा मृतदेह पाहून तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांना संशय व्यक्त केला. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
ही घटना गुरसायगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तहसियापूर गावात घडली. या गावात राहणारी एक महिला शनिवारी सकाळी शेतात मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेली. परंतु, रात्री उशीर होऊनही ती घरी न परतल्याने कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी शेजारच्या गावातील एक शेतकरी त्याच्या शेताला पाणी देण्यासाठी गेला असता संबंधित महिलेचा मृतदेह पाहून त्याच्या पाया खालची जमीन सरकली. तो ताबडतोब गावात गेला आणि लोकांना याबद्दल माहिती दिली.
मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमनेही या प्रकरणातील पुरावे गोळा केले. तसेच पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. लवकरच या प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकल्या जातील, असे अश्वासन पोलिसांनी दिले. या महिलेवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर अनेक गोष्टी समोर येतील.