Video : ह्रदयद्रावक! निकाहाआधीच खड्ड्यांमुळे तरुणीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 15:55 IST2019-10-10T15:53:18+5:302019-10-10T15:55:16+5:30
संतप्त नागरिकांनी केला रास्ता रोको

Video : ह्रदयद्रावक! निकाहाआधीच खड्ड्यांमुळे तरुणीचा मृत्यू
भिवंडी - भिवंडीमध्ये खड्ड्यांमुळे एका तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. पेशाने डॉक्टर असणारी ही तरुणी स्वतःच्या लग्नाच्या खरेदीसाठी जात असताना निकाह होण्याआधी काळाने तिच्यावर घाला घातला. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीवरुन खाली पडलेल्या या तरुणीला मागू येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने तिचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर मनोर- वाडा-भिवंडी रोडवर दुगाड फाटा येथे जिजाऊ संस्था आणि संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करुन या घटनेचा निषेध केला.२३ वर्षीय डॉ. नेहा शेख ही तरुणी तिच्या भावाबरोबर बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास वाडा-भिवंडी रोडवरुन घरी जात होती. दुचाकीवरुन दुगाड फाटा परिसरातून रात्रीच्या अंधारामधून जाताना रस्त्यावरील खड्डे चुकवत असताना दुचाकीचे चाक रस्त्यामधील खड्ड्यात गेले. त्यामुळे दुचाकी आदळल्याने मागे बसलेली नेहा रस्त्यावर पडली आणि त्यावेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकने तिला चिरडले. या अपघातात नेहाचा जागीच मृत्यू झाला. नेहाचा मृतदेह रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
नेहा वाडा येथील कुडूस गावात राहणारी असून तिचे पुढच्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये ७ तारखेला निकाह होता. बीएचएमएस करून नेहा डॉक्टर झाली होती. तिचे ताहीर असर यांच्यासोबत विवाह ठरला होता. मात्र, काळाने झडप घातल्याने तिचा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यू झाला.
भिवंडीमध्ये खड्ड्यांमुळे एका तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) October 10, 2019