“महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासात समृद्धीची पहाट घडवणार”; DCM एकनाथ शिंदे यांचा संकल्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 14:57 IST2026-03-19T14:55:10+5:302026-03-19T14:57:03+5:30
Deputy CM Eknath Shinde News: दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्याने ठाणे शहरात उत्साह, अभिमान आणि सांस्कृतिक ऐक्याची नवी ऊर्जा निर्माण केली.

“महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासात समृद्धीची पहाट घडवणार”; DCM एकनाथ शिंदे यांचा संकल्प
Deputy CM Eknath Shinde News: महाराष्ट्रातील प्रत्येक घरावर आनंदाची, प्रगतीची आणि विकासाची गुढी अभिमानाने उभारली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि माता-भगिनी यांच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण करून त्यांना यशाच्या उंच शिखरावर नेणे, हा आमचा संकल्प आहे. सामान्य माणसाच्या स्वप्नांना बळ देत त्याच्या आयुष्यात स्थैर्य, समृद्धी आणि आत्मविश्वासाची नवी पहाट उगवावी, यासाठी शासन सातत्याने कार्यरत राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ठाण्यातील गुढीपाडव्याची ही शोभायात्रा केवळ परंपरेचा भाग नसून स्वर्गीय आनंद दिघे यांनी दिलेल्या सांस्कृतिक वारशाची जपणूक करणारा आणि अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेणारा उत्सव ठरत असल्याकडे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लक्ष वेधले. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्याने ठाणे शहरात उत्साह, अभिमान आणि सांस्कृतिक ऐक्याची नवी ऊर्जा निर्माण केली.
नववर्षाचे स्वागत अधिक अर्थपूर्ण आणि संस्मरणीय केले
नववर्षाच्या या मंगलदिनी ठाणे शहराने केवळ सण साजरा केला नाही, तर परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर सेतू उभारला. सांस्कृतिक वैभव जपत समाजप्रबोधनाचा संदेश देणारी ही शोभायात्रा ठाणेकरांच्या एकजुटीची आणि सकारात्मकतेची जिवंत साक्ष ठरली. प्रत्येकाच्या मनात नव्या आशा, नव्या संकल्पांची पालवी फुटावी आणि येणारे वर्ष सर्वांसाठी यश, समाधान आणि समृद्धी घेऊन यावे, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली. गुढीपाडव्याच्या या सांस्कृतिक सोहळ्याने ठाणे शहराला नवचैतन्याची प्रेरणा देत नववर्षाचे स्वागत अधिक अर्थपूर्ण आणि संस्मरणीय केले.
टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात साजरा झाला गुढीपाडवा
घराघरांवर उभारलेल्या गुढ्या, फुलांचा दरवळ, चैतन्याने भारलेले वातावरण आणि रस्त्यांवर उमटणारा जल्लोष या सर्वांनी ठाण्याचा सांस्कृतिक माहोल अधिकच खुलवला. ठाणे शहरातील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आनंदआश्रमात देखील गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परंपरेनुसार आनंद आश्रमाच्या दरवाजापाशी गुढी उभारण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुढीचे पूजन करण्यात आले. यानंतर आनंद आश्रमातील स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.