Thanekar Showerful till January! | ठाणेकर जानेवारीपर्यंत शॉवरफुल!; लघुपाटबंधारे विभागाचा निर्णय
ठाणेकर जानेवारीपर्यंत शॉवरफुल!; लघुपाटबंधारे विभागाचा निर्णय

ठाणे : दिवाळी संपताच ठाणे जिल्ह्यात दरवर्षी सुरु होणारी १५ टक्के पाणीकपात यंदा होणार नाही. जिल्ह्यास पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा भरपूर पाणीसाठा असल्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत सर्व महापालिका, नगरपालिकांना त्यांच्या मंजूर कोट्यानुसार पाणी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर उपलब्ध पाणीसाठ्यास अनुसरून निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील पाच महापालिकांसह दोन नगरपालिका आणि ग्रामीण भागास मोठा दिलासा मिळाला आहे.

दरवर्षी दिवाळी झाल्यावर लागलीच सर्व शहरांमध्ये पाणीकपात लागू होत होती. त्यामुळे सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद केला जात होता. साहजिकच ज्या भागात सोमवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद असायचा तेथील सोसायट्यांमध्ये रविवारी दुपारीच पाणी बंद केले जात होते. सोमवारी पाणी नसल्याने काटकसरीने वापरावे लागायचे. सोमवारी पाणी नसल्याने मंगळवारी दिवसभर पाणीपुरवठ्यावर परिणाम असायचा. तात्पर्य हेच की, एक पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद असला तरी त्याची झळ त्या दिवसाच्या मागील व पुढील दिवसही जाणवायची. एप्रिल व मे महिन्यात आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात लागू केल्यावर आठवड्यात सहा दिवस पाण्याची बोंब असायची व जेमतेम एक किंवा दोन दिवस तुलनेनी बºयापैकी पाणी मिळायचे. त्यामुळे शॉवर सोडाच बालदीभर पाणी मिळाले तरी नशिब, अशी ठाणेकरांची अवस्था असायची. यंदा या त्रासापासून नागरिकांना दिलासा लाभला आहे. जानेवारी अखेरपर्यंत पाणीपुरवठा पूर्ण दाबाने मिळाला व फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये थोडीफार कपात लागू झाली तरी जेमतेम तीन महिने लोकांना कळ सोसावी लागेल. यंदा आॅक्टोबर अखेरपर्यंत पाऊस कोसळल्याने ठाणे जिल्ह्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. मात्र लांबलेला पाऊस आणि बारवी धरणाची उंची वाढल्याने अतिरिक्त पाणीसाठा त्यामुळे पाण्याचा दिलासा लाभला.

कळवा येथील लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यालयात सर्व महापालिकांच्या पाणीपुरवठा विभागांसह स्टेमघर, एमआयडीसी आदींची बैठक लघुपाटबंधारे विभागाने १५ नोव्हेंबर रोजी घेतली. मंजूर कोट्यानुसार पाणी उचलण्याची तंबी सर्वांना देण्यात आली. कोणीही जादा पाणी उचलण्याचा प्रयत्न करू नये. जानेवारीनंतर कपात करायची किंवा कसे, याविषयी निर्णय घेण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. यामुळे यंदा पाणीकपातीचे संकट टळले आहे.

जलपर्णी स्वच्छता केडीएमसीवर
उल्हास नदीपात्रातून पाणी उचलणाºया स्टेमघरसह कल्याण-डोंबिवली महापालिकेला मात्र उल्हास नदीतील जलपर्णी साफ करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या नदीपात्रात जलपर्णी होणार नाही, याची काळजी घेण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली. पाणी उचलण्याच्या ठिकाणी स्टेमघर व केडीएमसीने जलपर्णी होऊ न देण्याचे आदेश लघुपाटबंधारे विभागाकडून देण्यात आले आहेत.

बारवीत मुबलक पाणीसाठा : बारवी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यास अनुसरून जानेवारीनंतर पाणीपुरवठ्याच्या कमीअधिक प्रमाणाचा विचार करण्यावर मात्र सर्वांचे एक मत झाल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी नोव्हेंबरअखेर पाणीकपातीला तोंड द्यावे लागले होते. ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरांमधील लोकसंख्या वाढत असून बेकायदा इमारती, चाळी यामुळे पाण्याची समस्या नेहमीच भेडसावते. नोव्हेंबर ते मे या सात महिन्यांत या परिसरात दरवर्षी पाणीटंचाईचे संकट असल्याने अनेक वसाहतींमध्ये पाण्याकरिता वादावादी, भांडणे इतकेच काय हाणामारीच्या घटना घडल्या आहेत.
 

Web Title: Thanekar Showerful till January!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.