सदानंद नाईक
उल्हासनगर : हिराली फॉउंडेशनच्या माध्यमातून पर्यावरण, ध्वनी प्रदूषण बाबत रान उठविणाऱ्या समाजसेविका सरिता खानचंदानी या रोमा इमारतीच्या सातव्या मजल्यावरून गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता उडी घेऊन आत्महत्या केली. मात्र खानचंदानी यांचा घातपात की आत्महत्या? अशी चर्चा रंगली आहे. बुधवारी भाडेकरूच्या तक्रारीवरून खानचंदानी यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.
उल्हासनगरातून वाहणाऱ्या उल्हास व वालधुनी नदी प्रदूषण बाबत हिराली फॉउंडेशनच्या सर्वेसर्वा सरिता खानचंदानी यांनी आवाज उठविला आहे. तसेच शहरातील प्रदूषणा विरोधात गुन्हे दाखल करण्यास यापूर्वी पोलिसांना त्यांनी भाग पाडले होते. गुरुवारी सकाळी त्यांच्या ऑफिस समोरील रोमा इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून खानचंदानी यांनी खाली उडी घेतली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. डोंबिवली येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. रोमा इमारतीसमोर त्यांचे ऑफिस असून त्या ऑफीस मागील एक खोली ओळखीच्या जया या महिलेला भाड्याने दिली होती. बुधवारी खोली खाली करण्याच्या कारणावरून जया व खानचंदानी त्यांच्यात भांडण झाले. जया यांच्या तक्रारीवरून खानचंदानी यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी पत्रकारांना दिली.
गुरुवारी दुपारी १ वाजता खानचंदानी ह्या रोमा इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून खाली उडी घेऊन त्या गंभीर जखमी झाल्या. डोंबाविली येथील रुग्णालयात उपचार सूरु असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईक व घरच्या मंडळीकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता झाला नाही. सरिता खानचंदानी या रोमा इमारती मध्ये कशाला गेल्या? त्यांच्या मागे घातपात झाला का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभी ठाकली. खानचंदानी यांनी ध्वनी, वायू व पाणी प्रदूषणाबाबत आवाज उठवून अनेकांचा रोष ओढवून घेतला होता. एकेकाळी त्यांच्या सोबत काम करणाऱ्या जया यांनीही हिराली फौंडेशन मध्ये काम केले होते. मात्र खोली खाली करण्यावरून त्यांच्यात बुधवारी वाद होऊन खानचंदानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
सरिता खानचंदानी यांच्या मृत्यूने धक्का
शहरातील प्रदूषणाबाबत हिराली फॉउंडेशनच्या माध्यमातून आवाज उठविणाऱ्या सरिता खानचंदानी यांच्या मृत्यूने सामाजिक. क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला. याबाबत सकोली चौकशी करण्याची मागणी होत आहे.