वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 09:33 IST2025-11-21T09:32:35+5:302025-11-21T09:33:22+5:30
नारायण पवार आणि ४०-५० जमावासह शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली असा आरोप हरेश महाडिक आणि महेश लहाने यांनी केला आहे.

वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
ठाणे - मागील काही दिवसांपासून महायुतीतभाजपा आणि शिंदेसेना यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. ठाण्यात भाजपा आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पुढे आले आहे. भाजपाच्या माजी नगरसेवकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे ठाण्यात भाजपा आणि शिंदेसेना यांच्यातील वाद आणखी चिघळणार असल्याचं बोललं जात आहे.
काय आहे प्रकरण?
भाजपाच्या माजी नगरसेवकाकडून शिंदेसेनेच्या हरेश महाडिक आणि महेश लहाने या पदाधिकऱ्यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. माजी नगरसेवक नारायण पवार यांच्याकडून ही मारहाण झाल्याचा आरोप आहे. ठाण्यात BSUP प्रकल्पातील सदनिकाधारकांना मुंद्राक शुल्क व नोंदणीसाठी लागणारा ५० हजार ते १ लाखाचा खर्च माफ करून केवळ १०० रूपये करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयावरून भाजपा आणि शिंदेसेनेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली. एकनाथ शिंदेंमुळे हा निर्णय झाल्याचं सांगत शिंदेसेनेचे कार्यकर्ते BSUP इमारतीच्या बाहेर जल्लोष करत होते. तिथून व्हिडिओ कॉल करून लोकांचं थेट बोलणं एकनाथ शिंदेंशी करून देत होते. पाचपाखाडी येथील लक्ष्मीनगर सोसायटीजवळ शिंदेसेनेचे पदाधिकारी हरेश महाडिक आणि महेश लहाने शिंदेसैनिकांसोबत पेढे वाटून जल्लोष करत होते त्याचवेळी तिथे भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार कार्यकर्त्यांसह तिथे पोहचले.
नारायण पवार आणि ४०-५० जमावासह शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली असा आरोप हरेश महाडिक आणि महेश लहाने यांनी केला आहे. त्यानंतर रात्री उशिरा या दोघांनी नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. त्यात पोलिसांनी NC दाखल करून घेतली आहे परंतु या प्रकाराबाबत FIR दाखल व्हावी अशी शिंदेसेनेची मागणी आहे. आम्ही जल्लोष करत असताना भाजपाचे स्थानिक नगरसेवक नारायण पवार तिथे आले, त्यांनी आम्हाला शिवीगाळ केला, उपविभागप्रमुखा महेश लहानेला मारायला लागले, त्याचा जाब विचारायला गेलो तर आम्हालाही मारहाण केली असं हरेश महाडिक यांनी सांगितले आहे.
ठाण्यात शिंदेसेना-भाजपा संघर्ष
ठाणे जिल्ह्यात अलीकडच्या काळात शिंदेसेना-भाजपा यांच्यातील वाद वाढला आहे. एकीकडे नवी मुंबईतील गणेश नाईक यांनी शिंदेंना थेट आव्हान दिले आहे तर दुसरीकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिंदेसेनेचे बरेच माजी नगरसेवक भाजपात घेतल्याने एकनाथ शिंदे नाराज झाले. या नाराजीचे पडसाद राज्याच्या कॅबिनेट बैठकीत उमटले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिंदेंनी दिल्ली गाठत रवींद्र चव्हाण यांची तक्रार केल्याचे समोर आले. एकीकडे हा वाद कमी होत नसताना ठाण्यात भाजपाच्या माजी नगरसेवकाकडून शिंदेसैनिकांना झालेल्या मारहाणीमुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.