१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 05:30 IST2026-04-30T05:28:44+5:302026-04-30T05:30:52+5:30
मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर पोलिसांचे नियोजन कोलमडले, अपघातांनंतरही ही मशीन रात्रीच संबंधित यंत्रणनेने बाजूला करणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी बुधवारी दुपारी सुरुवात केली. त्यामुळे रात्रीपासूनच कोंडीत भर पडली.

१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
मुंबई - मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर १५ मिनिटाच्या अंतरासाठी चालकांना ५ ते सहा तास कोंडीत अडकले. हे मशीन बाजूला करण्यासाठी बुधवारी संपूर्ण रस्ताच काही तासांसाठी अडवून ठेवल्याने कोंडीत भर पडली. पोलिसांनी योग्य नियोजन न केल्याचा त्याचा फटका नागरिकांना बसला. बऱ्याच ठिकाणी पोलिस सोडून स्थानिकांकडून नियोजन होत असल्याचा आरोपही चालकांनी केला.
कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी मानखुर्द परिसरात दोन उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. रस्त्याच्या बाजूला पत्रे लावून पिलर उभारण्यासाठी मोठ्या मशीन मार्फत खोदकाम सुरू आहे. त्यामुळे या भागात आधीच मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यात, मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास खोदकाम सुरू असताना रस्त्याच्या मधोमध क्रेन कोसळली. यात पोलिसाचा बळी गेला. रस्त्याच्या मधोमध एवढ्या मोठ्या मशीनद्वारे सुरु असलेल्या कामाकडे पालिका, स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिस यांनी दुर्लक्ष केले.
अपघातांनंतरही ही मशीन रात्रीच संबंधित यंत्रणनेने बाजूला करणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी बुधवारी दुपारी सुरुवात केली. त्यामुळे रात्रीपासूनच कोंडीत भर पडली. मशीनचे वजन जास्त असल्याने तिला बाजूला करण्यासाठी रस्त्याच्या मधोमध मोठी क्रेन उभी करण्यात आली. मात्र या क्रेनमुळे मुंबईहून नवी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली. तर चेंबूर ते मानखुर्द हे १२ ते १५ मिनिटांचे अंतर कापण्यासाठी वाहन चालकांना पाच ते सहा तास लागले होते.
प्यायला पाणी नाही... टॉयलेट बाथरूम नाही
पंधरा मिनिटाच्या प्रवासासाठी निघालेले प्रवासी तासनतास रस्त्यावर अडकून पडले. अनेकांच्या गाडीत पिण्याचे पाणीही नव्हते. प्यायला पाणी नाही. मधुमेहाच्या रुग्णांना टॉयलेट बाथरूम नाही. उलटे फिरून परत जाता येत नाही, अशा विदारक स्थितीत महामुंबई कर अडकले. २६ जुलैच्या महापुरात जसे हाल झाले त्यापेक्षा भयंकर हाल ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या हजारो वाहन चालकांचे आणि प्रवाशांचे अतोनात झाले. ट्रॅफिक पोलिसांच्या ट्विटर हँडलवर संतप्त प्रतिक्रियांचा पाऊस होता.
२४ तास लाेकांची ट्रॅफिकशी झुंज...
मंगळवारी मध्यरात्री एक वाजता क्रेन कोसळली. मात्र दुसऱ्या दिवशी रात्री एक वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत झालेली नव्हती. २४ तास लोक ट्रॅफिकशी झुंज देत आपापल्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. अशावेळी अटल सेतू खुला करून दिल्याची कसलीही सूचना पोलिसांनी मुंबईकरांना दिली नाही. त्यामुळे ट्रॅफिक मध्ये अडकलेले मुंबईकर ना अटल सेतूला जाऊ शकले ना नवी मुंबईत..!
गावकडे धावणाऱ्यांचे हाल
मुंबईतून पुणे, सातारा, सांगली यासह बेंगलोरकडे मोठ्या संखेने रोज प्रवासी वाहतूक होत असते. त्यांच्यासाठी रोज संध्याकाळी धावणाऱ्या बहुतांश ट्रव्हल्स मुंबईतून सुटतात. बुधवारी रात्री मानखुर्दसह परिसरात झालेल्या कोंडीचा फटका या ट्रव्हल्स प्रवश्यांना देखील बसला.
वरळीहून नवी मुंबई गाठायला चार तास
क्रेन हटवल्यानंतर सायंकाळी सहा वाजता वरळीहून नवी मुंबईला निघालेले नागरिकांना नेमके कुठून कसे जायचे याबाबत योग्य माहिती मिळत नव्हती तसेच पोलिसही दिसले नसल्याचे सांगितले. अनेक अडथळे पार करत रात्री ११ वाजता नवी मुंबईत कसेबसे पोहचल्याचे सांगितले.