पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 19:31 IST2025-08-13T19:29:00+5:302025-08-13T19:31:03+5:30
पोलिसांनी आरोपी तरुणीला गुजरातच्या नवसारी येथून अटक करून चोरी झालेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती दिली. पण, तरुणीने बहिणीच्या सासऱ्यालाच कसं गंडवलं?

पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ
नालासोपारा : वसईमध्ये भरदिवसा वृद्धाला बाथरूममध्ये कोंडून तब्बल दीड कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली होती. या गंभीर गुन्ह्याचा १२ तासांत उलगडा करण्यात मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. सुनेच्या बहिणीनेच टोपी, दाढी, मिशी असा पुरुषाचा पेहराव करून ही चोरी केल्याची बाब उघड झाली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पोलिसांनी आरोपी तरुणीला गुजरातच्या नवसारी येथून अटक करून चोरी झालेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
वसईच्या शास्त्री नगर येथील किशोर कुंज अपार्टमेंटमध्ये राहणारे ओधवजी भानुशाली (६६) हे ११ ऑगस्टला दुपारी घरात एकटे होते. घरातील बाकी सर्व रक्षाबंधन सणानिमित्त गुजरातला गेले होते. त्यावेळी त्यांच्या मोठ्या सुनेची सख्खी बहीण ज्योती भानुशालीने ही चोरी केली.
बहिणीचा सासरा होता एकटा, ती गेली आणि म्हणाली...
चोरी करण्यासाठी तिने अनोखी शक्कल लढवत पुरुषाचा वेश धारण करून बहिणीच्या घरी गेली. रूम पाहिजे असे सांगत बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने घरात शिरली. त्यानंतर ओधवजी यांना बाथरूममध्ये कोंडून घरातील कपाटात ठेवलेले दीड कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला.
या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ या घटनेचा तपास सुरू केला होता.
चोरी करणाऱ्या तरुणीचा कसा घेतला शोध?
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना एका पुरुषाच्या वेशात असलेल्या व्यक्तीवर संशय आला. या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी अधिक तपास केला. तेव्हा ही व्यक्ती पुरुष नसून एक तरुणी असल्याचे उघड झाले.
मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज व माहितीच्या आधारे मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या बारा तासातच आरोपी तरुणीला गुजरातच्या नवसारी येथून अटक केली. चोरी केलेला दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आरोपी तरुणीला वसई न्यायालयात हजर केल्यावर १८ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे व सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष मदने, संतोष चव्हाण, मनोहर तावरे, आसिफ मुल्ला, पोलीस हवालदार प्रविणराज पवार, समीर यादव, शिवाजी पाटील, धनजंय चौधरी, गोविंद केंद्रे, रविंद्र भालेराव, विकास राजपूत, रविंद्र कांबळे, हनुमंत सुर्यवंशी, विजय गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.