ठाणे शहरात 20 हजार मोलकरणींच्या रोटीची सोय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 12:07 AM2021-04-19T00:07:29+5:302021-04-19T00:08:10+5:30

नाेंदणी नसलेल्या लाखभर घरेलू कामगारांच्या लाभाचे काय?

Provision of bread for 20,000 maids in Thane city | ठाणे शहरात 20 हजार मोलकरणींच्या रोटीची सोय 

ठाणे शहरात 20 हजार मोलकरणींच्या रोटीची सोय 

Next



स्नेहा पावसकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा संचारबंदी करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला आहे. या बंदचा सर्वाधिक फटका माेलमजुरी करणाऱ्या वर्गाला बसतो. हे लक्षात घेत शासनाने काही घटकांना आर्थिक साहाय्य करण्याचे जाहीर केले आहे. यात घरकामगार करणाऱ्या महिलांनाही सरकारने महिना १२०० रुपये साहाय्य जाहीर केले आहे. ठाणे जिल्ह्यात आजच्या घडीला २० ते २२ हजार घरकामगार या नोंदणीकृत आहेत. तर सुमारे १ लाख घरकामगार महिलांची नोंदणीच नाही. त्यापैकी काहींच्या नोंदणीचे नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे एकूणच नोंदणी नसलेल्या लाखभर घरकामगारांच्या पोटापाण्याचे काय? असा प्रश्न त्यांच्या संघटनेकडून उपस्थित केला जात आहे.
मागील वर्षीच्या लाॅकडाऊनमुळे घरकामगार महिलांचा रोजगार बंद झाला होता. गेल्या काही महिन्यांत ही कामे पुन्हा थोडीथोडी सुरू होत नाही तोच कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढल्याने पुन्हा एकदा राज्यात १५ दिवसाची संचारबंदी जाहीर केली आहे. हातावर पोट असलेल्या घरकामगार महिलांसाठी शासनाने आर्थिक मदत जाहीर केली; परंतु ज्यांची नोंदणी नाही अशा महिलांना याचा लाभ मिळणार नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचे वातावरण आहे. तर काही महिलांनी आता हा लाभ मिळावा म्हणून नोंदणीसाठी धावपळ सुरू केली आहे.

nराज्य सरकारच्या वतीने घरेलू कामगारांसाठी संत जनाबाई योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मोलकरणींची नोंदणी सुरू आहे. नाेंदणी असलेल्या घरकामगारांना शासनाकडून आर्थिक साहाय्य मिळणार आहे. 
nमात्र, आता जिल्ह्यात नोंदणी नसलेल्या घरकामगारांच्या नोंदणीच्या प्रक्रियेने वेग धरला आहे. नोंदणीसाठी किंवा नूतनीकरणासाठी या घरकामगार महिला लेबर ऑफिसमध्ये पोहोचत आहेत.
सध्या घरकामगार महिलांची परिस्थिती खूप कठीण आहे आणि सरकारने मदत जाहीर केली, हे दिलासादायक आहे; पण ती मदतही तुटपुंजी आहे. त्यातही नोंदणी झालेल्या महिला खूप कमी आहेत. काही घरकामगार महिलांकडे पुरावे नसल्याने त्यांची नोंदणी झाली नाही, अशा स्थलांतरित महिलांची संख्या जास्त आहे. वयस्कर महिलांनाही लाभ मिळणार नाही. एकंदर ही मदत सर्व घरकामगारांना मिळणे कठीण आहे.
    -रेखा जाधव, डिस्ट्रिक्ट को ऑर्डिनेटर, नॅशलल डोमेस्टिक वर्कर्स वेलफेअर     ट्रस्ट, मुंबई

आमचा विचार करून शासनाने आम्हाला छोटी का असेना मदत जाहीर केली, याचे समाधान आहे. मात्र, ही मदत कमी आहे, त्यात थोडी वाढ करावी आणि कोविडचे हे संकट असेपर्यंत आम्हाला असेच साहाय्य करावे, अशी अपेक्षा आहे.
    - विमल देरसे, घरेलू कामगार
सरकारने गेल्यावर्षी नाही; पण आता मदत देणार असल्याचे सांगितले. याने आम्हाला थोडाफार हातभार लागेल; पण आमच्यापैकी अनेक महिलांची नोंदणी विविध कारणाने रखडली आहे, त्या महिलांचाही विचार करून आर्थिक साहाय्य करावे, कारण अनेक घरमालकांनी आम्हाला पुन्हा काम बंद करायला सांगितले आहे.
    - दीपा सांबड, घरेलू कामगार

Web Title: Provision of bread for 20,000 maids in Thane city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.