उल्हासनगरात जयंतीचे बॅनर्स फाडल्या प्रकरणी ठिय्या आंदोलन, चौघाना अटक; दुसऱ्या घटनेत ६ जाणावर एक्ट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 17:46 IST2026-04-17T17:45:23+5:302026-04-17T17:46:03+5:30
संतप्त नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केल्यावर उल्हासनगर पोलिसांनी चौघाना अटक केली. तर दुसऱ्या घटनेत विठ्ठलवाडी पोलिसांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मिरवणुकीत धुडगूस घालणाऱ्या सहा जणावर एक्ट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

उल्हासनगरात जयंतीचे बॅनर्स फाडल्या प्रकरणी ठिय्या आंदोलन, चौघाना अटक; दुसऱ्या घटनेत ६ जाणावर एक्ट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
उल्हासनगर : कॅम्प नं-२, टेलिफोन एक्सचेंज जवळील राहुलनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त लावण्यात आलेले बॅनर्स फाडल्याचा प्रकार उघड झाला. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केल्यावर उल्हासनगरपोलिसांनी चौघाना अटक केली. तर दुसऱ्या घटनेत विठ्ठलवाडी पोलिसांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मिरवणुकीत धुडगूस घालणाऱ्या सहा जणावर एक्ट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
उल्हासनगरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दरम्यान कॅम्प नं-२, राहुलनगर येथे जयंती बॅनर्स फाडल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उघड झाला. या प्रकारामूळे आंबेडकरी समाजात संतापाची लाट उसळली. स्थानिक नेते संदीप गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली असंख्य जणांनी गुरुवारी रात्री रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून दोषींना अटक करण्याची मागणी केली. रिपाई शहरजिल्हाध्यक्ष व नगरसेवक नाना बागुल यांनी याप्रकरणी पोलिसांना धारेवर धरून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीना अटक करण्याची मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला. शुक्रवारी सकाळी १० वाजे पर्यंत आरोपीना अटक झाली नाहीतर शहरभर आंदोलनाचा इशारा बागुल यांनी दिल्याने, पोलीस कामाला लागले.
उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर, पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे काही तासात चौघाना अटक केली. चार पैकी २ आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी दिली. तसेच यामध्ये चार पेक्षा जास्त आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तर दुसऱ्या प्रकारात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशेळे गावातही डॉ बाबासाहेब आंबेडकर मिरवणुकी दरम्यान दंगल घडविण्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी ६ जणावर ऍट्रॉसिटी व दंगल घडविण्याचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीना अटक केल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली आहे.