Poster War in Sena-MNS in Thane now; Accusations against each other | ठाण्यात आता सेना-मनसेमध्ये पोस्टर वॉर; एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

ठाण्यात आता सेना-मनसेमध्ये पोस्टर वॉर; एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

ठळक मुद्देएकीकडे पालकमंत्री यांच्या कार्याचे दाखले देणारा तर त्याच्या बाजूला अविनाश जाधव कधी थांबणार नाही असे म्हणणारे होर्डिंगस लागले आहेत.

ठाणे : गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री यांच्यावर मनसैनिकांकडून टीका करण्यात येत आहे. अलिकडे शिवसेनेनेही त्यांच्या टीकेला उत्तर दिले. काही दिवसांपासून सुरू असलेला सोशल मीडियावरचा वॉर आता पोस्टरवर आला आहे. आज ठाणेकरांना तीन हात नाका येथे पोस्टर वॉर पाहायला मिळाला. एकीकडे पालकमंत्री यांच्या कार्याचे दाखले देणारा तर त्याच्या बाजूला अविनाश जाधव कधी थांबणार नाही असे म्हणणारे होर्डिंगस लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांची ही श्रेयवादाची लढाई सुरू असल्याची प्रतिक्रिया ठाणेकरांनी दिली. 

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस आल्यानंतर आणि त्यांना अटक झाल्यानंतर मनसैनिकांकडून पालकमंत्री यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली. सोशल मीडियावर ही शाब्दिक युद्ध सुरू होते. त्या आधी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याची मागणी मनसैनिकांकडून केली जात होती. त्यानंतर महापौर नरेश म्हस्के आणि शिवसेनेचे राम रेपाळे यांनीही त्यांच्या टिकेला उत्तरे देऊन पालकमंत्री यांच्यावर वैयक्तिक टीका करणे चुकीचे आहे असे म्हटले होते. दोन्ही पक्षातील वाद अद्याप मिटलेला नाही हे तीन हात नाका येथे लावण्यात आलेल्या होर्डिंगस वरून दिसून येत आहे. 

सेना - मनसे यांनी एकमेकांच्या बाजूला लावलेले होर्डिंगस ठाणेकरांच्या चर्चेचा विषय बनला आहे. भविष्यात वाद चिघळण्याची शक्यता आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कोविडच्या परिस्थितीत राजकारण करून श्रेय घेण्यापेक्षा नागरिकांच्या हिताची कामे करणे आवश्यक आहे. ठाणेकरांना सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकारणात रस नसल्याचे त्यांनी सांगितले. 

तीन हात नाका येथे आम्हीच होर्डिंग लावले आहे. यात कोणावर आरोप न करता पालकमंत्री यांचे काम दाखविले आहे. मनसेने पालकमंत्री यांच्यावर वैयक्तिक पातळीवर जी टीका केली त्याला या होर्डिंगसच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेत आम्हाला 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही शिकवण दिली आहे. पण मनसे आमच्या 20 टक्के राजकारणाला घाबरले आहे. पुढे नाकावरून पाणी गेल्यास पालकमंत्री यांचे मार्गदर्शन घेऊनच पाऊल उचलणार. - मृणाल रेपाळे, शिवसैनिक

 तीन हात नाक्याला लावलेल्या होर्डिंग मधून पालकमंत्री याना आम्ही उत्तर दिले आहे. आमच्या बॉसवर जो अन्याय केला त्याच्यावर ती प्रतिक्रिया होती. जाधव यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. - करण खरे, मनसैनिक 

मनसेकडून पालकमंत्री यांच्यावर एकेरी उल्लेख करीत, वैयक्तिक पातळीवर टीका आणि खोटे आरोप केले जात आहेत. त्यामुळे त्यांनी कोरोनाकाळात केलेले काम दाखविणारे होर्डिंगस युवा सेनेच्यावतीने नितीन कंपनी येथे लावले आहे. - निखिल कणसे, शिवसैनिक 

महापालिकेने जरी खोटा गुन्हा जाधव यांच्यावर दाखल केला तरी त्यामागचा बोलवता धनी वेगळा आहे. सत्ताधारी आणि पालकमंत्री यांनी दबावतंत्र वापरून हा गुन्हा दाखल केला. परंतु ठाणेकर हे सत्याच्या बाजूनेच उभे राहतील. - दिनेश मांडावकर, मनसैनिक 

आताचे संकट पाहता सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. परंतु तसे दिसत नाही, ही श्रेयवादाची लढाई आहे. ठाणेकरांना तुमचे राजकारण नको तर त्यांना त्यांचे प्रश्न सोडवून हवे आहेत. तुम्ही काय केले याचा ढोल वाजविण्यापेक्षा ठाणेकरांचे प्रश्न सुटलेत की नाही याकडे लक्ष द्यावे. 
- मकरंद जोशी, सुज्ञ ठाणेकर 

सत्ताधारी असो वा विरोधक यांचे डावपेच ठाणेकरांच्या हिताचे नाही. कोणतीही आंदोलने करा पण ती सनदशीर मार्गाने करावी. ठाणेकरांना सर्व दिसत आहे. सध्याचे जे आरोप किंवा टीका सुरू आहेत त्यातुन ठाणेकरांना कोणताही फायदा होणार नाही. ठाणेकरांना कोणती मदत करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 
- जगदीश खैरालिया, सुजाण नागरिक
 

Web Title: Poster War in Sena-MNS in Thane now; Accusations against each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.