आशेळेपाड्यात भरतेय ऑफलाइन शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:24 AM2020-09-25T00:24:29+5:302020-09-25T00:24:45+5:30

सुनील अहिरे देताहेत धडे : ३५ विद्यार्थ्यांना मिळाला मोठा आधार

An offline school in Ashelepada | आशेळेपाड्यात भरतेय ऑफलाइन शाळा

आशेळेपाड्यात भरतेय ऑफलाइन शाळा

googlenewsNext

मुरलीधर भवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण: कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महापालिकांच्या सीमेवरील आशेळेपाडा येथील शिक्षणापासून आॅफलाइन असलेल्या ३५ विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते सुनील अहिरे करीत आहेत. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागली असून एक मोठा दिलासा मिळाला आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अद्याप शाळा सुरू केलेल्या नाहीत. मात्र, शिक्षण थांबू नये, यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण दिले जात आहे. आशेळेपाडा येथील गणराज कॉलनीतील बहुतांश रहिवासी नोकरदार, कामगार व कष्टकरी आहे. तेथील घरांतील कमावत्या व्यक्तीकडे मोबाइल आहे. सध्या अनलॉकमध्ये कामधंदा सुरू झाल्याने ते मोबाइल घेऊन कामाला जातात. त्यामुळे त्यांच्या पाल्यांना आॅनलाइन अभ्यास कसा करायचा, असा प्रश्न पडतो. परिणामी, हे विद्यार्थी आॅफलाइन झाल्याने त्यांना याच चाळीत राहणारे अहिरे शिक्षणाचे धडे देत आहेत.
अहिरे हे कोरो इंडिया या सामाजिक संस्थेत पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते आहेत. शिक्षण, आरोग्य अशा विविध विषयांवर त्यांची संस्था काम करते. लोकलअभावी ते सध्या मुंबईत जाऊन काम करू शकत नाहीत. त्यामुळे ते घरून संस्थेचे काम करत आहेत. त्याचबरोबर ते आपल्या चाळीतील मुलांना दीड महिन्यांपासून दररोज सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान शिकवत आहेत. त्यांच्या आॅफलाइन शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे ३५ विद्यार्थी आहेत. अहिरे हे कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता के वळ एक सामाजिक कर्तव्यापोटी त्यांना ज्ञानार्जन करत आहेत.


सरकारने सुविधा उपलब्ध
करून द्यावी

अहिरे म्हणाले की, आॅनलाइन शिक्षणाचा पर्याय हा सगळ्याच विद्यार्थ्यांना शक्य नाही. गरीब मुलांकडे मोबाइलही नसल्याने त्यांचा अभ्यास बुडत आहे. त्यामुळे कालांतराने त्यांची शिक्षणाविषयीची आवड नष्ट होऊ शकते. सरकारचा आॅनलाइन शिक्षणाचा पर्याय हा चांगला असला, तरी मुंबईपासून ६० किलोमीटरवरील शहरी भागातील आशेळेपाडा येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तर, ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागातील विद्यार्थी आॅनलाइन शिक्षण कसे घेतील? सरकारने आॅनलाइन शिक्षणासाठी दुर्गम, ग्रामीण आदिवासी भागात आॅनलाइनची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा हे विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहतील.

Web Title: An offline school in Ashelepada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.