Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय व भविष्याचा अंदाज : मशीन खरंच भविष्य सांगू शकते का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 07:07 IST2026-04-14T07:07:07+5:302026-04-14T07:07:07+5:30
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: मशीन खरंच भविष्य पाहू शकते का?

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआय व भविष्याचा अंदाज : मशीन खरंच भविष्य सांगू शकते का?
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आज आपण अशा काळात जगतो आहोत जिथे हवामानाचा अंदाज, शेअर बाजारातील चढउतार, आजारपणाचा धोका, विद्यार्थ्यांचे निकाल, अगदी एखाद्या गुन्ह्याची शक्यता - हे सगळं एआयच्या मदतीने आधीच सांगितलं जात आहे. काही अंशी आपण अशा युगात प्रवेश केला आहे, जिथे डेटा हेच नवं तेल आहे आणि अल्गोरिदम हे नवे विश्लेषक आहेत. प्रश्न असा आहे की, मशीन खरंच भविष्य पाहू शकते का?, की ती केवळ भूतकाळाच्या आरशात पाहून उद्याचा अंदाज बांधते?
एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. ती भविष्य भाकीत करत नाही, तर ती भूतकाळातील आणि वर्तमानातील प्रचंड डेटाचा अभ्यास करून पॅटर्न ओळखते. उदाहरणार्थ, मागील ५० वर्षांचा पावसाचा डेटा, तापमानातील बदल, वाऱ्याचा वेग, वातावरणातील दाब या सगळ्यांच्या आधारे एआय अंदाज लावतो की, उद्या पाऊस पडू शकतो. हा जादू नाही, ही गणिती शक्यता आहे. ही शक्यता टक्केवारीत व्यक्त केली जाते. ७० टक्के पावसाची शक्यता म्हणजे १० पैकी ७ वेळा अशा परिस्थितीत पाऊस पडला आहे.
आज अनेक क्षेत्रांत एआय भविष्यवाणी करत आहे. आरोग्य क्षेत्रात एखाद्या व्यक्तीला मधुमेह किंवा हृदयरोग होण्याची शक्यता सांगितली जाते. एक्स-रे आणि एमआरआय स्कॅनचे विश्लेषण करून कर्करोगाची सुरुवातीची चिन्हे ओळखली जातात. शेतीत पिकाचं उत्पादन किती होईल, कोणत्या भागात कीड वाढू शकते, पाण्याची गरज किती भासेल याचा अंदाज घेतला जातो. शिक्षणात विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयी, उपस्थिती, पूर्वीचे गुण यावरून त्यांच्या कामगिरीचा अंदाज बांधला जातो. व्यवसायात ग्राहक काय खरेदी करतील, कोणता उत्पादन ट्रेंडमध्ये जाईल, कोणती गुंतवणूक फायदेशीर ठरेल हे मॉडेल्स सूचित करतात.
पण इथे एक मोठा प्रश्न आहे जर मशीनने सांगितलं की, एखादा विद्यार्थी अपयशी ठरेल, तर आपण त्याला आधीच कमकुवत म्हणून बघायला लागणार का ? जर एआयने सांगितलं की, एखाद्या भागात गुन्हा होण्याची शक्यता आहे, तर त्या भागातील लोकांकडे संशयाने पाहायचं का? अशा प्रकारे अंदाज वास्तव घडवू लागला, तर ती धोकादायक बाब ठरू शकते. कारण, अंदाज हा इशारा असतो, शिक्का नाही. एआय शक्यता सांगू शकतो, पण तो निर्णय घेत नाही.
Moral Story
Arjun loved using AI to plan everything. He asked it which subjects to choose, which sports to play, even which friends might help him succeed. One day, the AI predicted he would fail in a mathematics competition based on past scores. Arjun felt discouraged, but instead of accepting the prediction, he decided to work harder. He practiced daily, asked questions, and improved steadily. On competition day, he surprised everyone -including himself - by winning second prize. Arjun understood that predictions show possibilities, not destiny. The future is shaped by effort, courage, and choices, not by algorithms alone.
मूलभूत घटक
- डेटा गुणवत्ता - अचूक, अद्ययावत आणि प्रतिनिधिक डेटा आवश्यक. चुकीचा किंवा अपूर्ण डेटा = चुकीचे अंदाज. पक्षपाती डेटा असल्यास निर्णयही पक्षपाती होतात.
- संदर्भ आणि मानवी समज - केवळ आकडे पुरेसे नसतात. सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांचा विचार आवश्यक. परिस्थिती बदलल्यास मॉडेल अपडेट करणे गरजेचे.
- नैतिकता व पारदर्शकता - अंदाज सार्वजनिक केल्याने मानसिक परिणाम होऊ शकतो. व्यक्तीच्या गोपनीयतेचे रक्षण आवश्यक. अल्गोरिदम कसे काम करतात याबद्दल पारदर्शकता महत्त्वाची.
- मानवी हस्तक्षेप - अंतिम निर्णय माणसानेच घ्यावा. एआयचा वापर "सहायक म्हणून करावा.
- अजिंक्य देशमुख