AI समिटमध्ये 'कोल्ड वॉर'! मोदींसमोरच ऑल्टमॅन आणि अमोदेई यांचा हात पकडण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 15:57 IST2026-02-19T15:55:51+5:302026-02-19T15:57:59+5:30
Delhi AI Summit 2026: दिल्लीतील एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सॅम ऑल्टमॅन आणि डारियो अमोदेई यांच्यातील जुना वाद पुन्हा चव्हाट्यावर आला. एकमेकांचा हात धरण्यास नकार दिल्याने व्हिडिओ व्हायरल.

AI समिटमध्ये 'कोल्ड वॉर'! मोदींसमोरच ऑल्टमॅन आणि अमोदेई यांचा हात पकडण्यास नकार
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या 'इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६' मध्ये एक अत्यंत विचित्र आणि चर्चास्पद क्षण पाहायला मिळाला. जगातील दोन सर्वात मोठ्या AI कंपन्यांचे प्रमुख—ओपन-एआयचे सीईओ सॅम ऑल्टमॅन आणि अँथ्रोपिकचे सीईओ डारियो अमोदेई हे एकाच मंचावर आले खरे, पण त्यांच्यातील व्यावसायिक वैमनस्य कॅमेरासमोर लपून राहिले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर मंचावर उपस्थित असलेल्या जागतिक टेक लीडर्सचा एक ग्रुप फोटो काढला जाणार होता. यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या दोन्ही बाजूला असलेल्या सुंदर पिचाई आणि सॅम ऑल्टमॅन यांचे हात हातात घेऊन ते हवेत उंचावले. परंपरेनुसार मंचावरील सर्वांनी एकमेकांचे हात पकडून एकतेचा संदेश देणे अपेक्षित होते. मात्र, सॅम ऑल्टमॅन आणि त्यांच्या शेजारी उभे असलेले डारियो अमोदेई यांनी एकमेकांचा हात पकडण्यास नकार दिला. एकमेकांचे हात धरण्याऐवजी दोघांनीही स्वतंत्रपणे आपल्या मुठी हवेत उंचावल्या. या 'ऑकवर्ड' क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, याला 'AI वर्ल्डमधील कोल्ड वॉर' म्हटले जात आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी देखील काही क्षण या प्रकाराकडे पाहत होते.
When AGI?
— Siddharth Bhatia (@siddharthb_) February 19, 2026
The day Dario and Sam hold hands. pic.twitter.com/bfmqgnTV89
या संघर्षाची मुळे जुनीच!
डारियो अमोदेई हे एकेकाळी सॅम ऑल्टमॅन यांच्या ओपन-एआयमध्येच 'व्हाईस प्रेसिडेंट ऑफ रिसर्च' म्हणून कार्यरत होते. मात्र, २०२१ मध्ये सॅम ऑल्टमॅन यांच्या कार्यपद्धतीवर आणि 'AI सुरक्षे'च्या मुद्द्यावरून त्यांचे मतभेद झाले. अमोदेई यांनी ओपन-एआय सोडून आपली स्वतःची 'अँथ्रोपिक' ही कंपनी स्थापन केली. आज अमोदेई यांची 'क्लोड' ही चॅटबॉट सिस्टीम ऑल्टमॅन यांच्या 'चॅटजीपीटी'ला तगडी टक्कर देत आहे. दिल्लीतील या परिषदेत एकाच मंचावर येऊनही या दोन दिग्गजांमधील तणाव कमी झालेला नाही, हेच या घटनेतून अधोरेखित झाले आहे.