परिवहन कर्मचाऱ्यांचा अचानक बंद !

By Admin | Updated: July 2, 2014 00:54 IST2014-07-02T00:54:20+5:302014-07-02T00:54:20+5:30

दोन महिन्यांचा पगार थकला : तीन तासांनंतर बस मार्गावर

Transport workers suddenly shut! | परिवहन कर्मचाऱ्यांचा अचानक बंद !

परिवहन कर्मचाऱ्यांचा अचानक बंद !


सोलापूर : दोन महिन्यांचा पगार थकल्याने एसएमटीच्या (सोलापूर महापालिका परिवहन) कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी अचानक कामबंद आंदोलन केल्याने प्रवाशांची दैना झाली. परिवहन व्यवस्थापक व पदाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तीन तासांनी बसगाड्या मार्गस्थ झाल्या.
परिवहन कर्मचाऱ्यांचा मे व जून महिन्याचा पगार थकला आहे. परिवहन खात्याने टप्प्याने पगार देण्याची तयारी केली होती. पण सध्या शाळा सुरू झाल्याने कर्मचारी अडचणीत आले आहेत. मंगळवारी पहाटे कामावर हजर झालेले सर्व कर्मचारी सात रस्ता डेपोसमोर एकत्र आले व त्यांनी पगाराचा निर्णय झाल्याशिवाय गाड्या बाहेर न काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व कर्मचारी प्रवेशद्वारावर बसून राहिले. इकडे सकाळी बस न आल्याने शाळकरी मुले, भाजीपाला विक्रेत्यांची अडचण झाली. परिवहन व्यवस्थापक प्रदीप खोबरे, सभापती आनंद मुस्तारे, माजी महापौर आरिफ शेख, संजय हेमगड्डी आदींनी तेथे धाव घेतली. महापालिकेकडून ४0 लाख मिळाल्यावर १२ जुलैपर्यंत मे महिन्याचा पगार अदा केला जाईल. लवकरच परिवहनचे बजेट येणार आहे. त्यात मंजुरी मिळाल्यावर जूनचा पगार अदा केला जाईल, असे आश्वासन दिल्यावर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. तीन तासांनी बस मार्गस्थ झाल्या.
परिवहन खात्याच्या ७0 बस धावत असून, दरोज साडेचार लाखांचे उत्पन्न मिळते पण त्या मानाने खर्च पावणेसात लाख आहे. महिन्याकाठी पगाराला ८0 लाख लागतात. जून महिन्यात फेसबूक प्रकरणामुळे झालेल्या आंदोलनात परिवहनचे २५ लाखांचे नुकसान झाले. अशात महापालिकेकडून डिझेल खर्चापोटी मिळालेल्या २२ लाखांपैकी १२ लाखांचा धनादेश वटला नाही. याशिवाय परिवहनची महापालिकेकडे ६६ लाखांची बिले प्रलंबित आहेत.

Web Title: Transport workers suddenly shut!