जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 21:20 IST2025-11-15T21:19:16+5:302025-11-15T21:20:21+5:30
सांगोला-मिरज रोडवरील वाटंबरेनजीक दोन मोटारसायकलींचा अपघात झाला. यात एका दुचाकीवरील व्यक्तीचा मृत्यू झाला. जो व्यक्ती मरण पावला, तो चोरी करून पळून जात होता, अशी माहिती समोर आली.

जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
Maharashtra Crime: दुचाकी चोरून भरधाव वेगाने पळून जाताना दुसऱ्या दुचाकीसोबत समोरासमोर झालेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचोराचा मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सांगोल्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात गुरुवार, दि. १३ रात्री ११:३०च्या सुमारास सांगोला ते मिरज रोडवरील वाटंबरे हद्दीतील पांडेजी धाब्यानजीक घडला.
संजय प्रकाश वायभट व रामकृष्ण पुंडलिक वायभट (दोघेही रा. पिंपळनेरी, ता. पाटोदा, जिल्हा बीड) अशी जखमींची नावे आहेत, तर मृताचे नाव व पत्ता समजू शकला नाही.
याबाबत, सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी खबर दिली असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
जखमी संजय वायभट व रामकृष्ण वायभट असे दोघेजण मिळून गुरुवारी रात्री ११:३०च्या सुमारास दुचाकीवरून (एमएच २३ बीजे २६९९) मिरजहून सांगोल्याकडे येत होते.
मृत चोरटा सांगोल्यात चोरी केलेल्या दुचाकीवरून (एमएच ०९ बीएफ ७४०८) सांगोल्यांकडून भरधाव वेगाने मिरज रोडने निघाला होता. वाटेत वाटंबरे, ता. सांगोला हद्दीतील एका धाब्यानजीक दोन्हीही दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली.