४५ दिवस प्रवास करून एनटीपीसीचा टर्बाईन सोलापुरात

By Admin | Updated: July 3, 2014 01:26 IST2014-07-03T01:26:55+5:302014-07-03T01:26:55+5:30

२५० चाकी कंटेनर : २० दिवस पुणे नाक्याला थांबणार

NTPC's Turbine travels for 45 days in Solapur | ४५ दिवस प्रवास करून एनटीपीसीचा टर्बाईन सोलापुरात

४५ दिवस प्रवास करून एनटीपीसीचा टर्बाईन सोलापुरात

 सोलापूर:अबब २५० चाकी कंटेनर, भिवंडीहून एनटीपीसीचा टर्बाईन घेऊन तब्बल ४५ दिवसांनी सोलापुरात पोहोचला. आता सोलापूर ते एनटीपीसी प्रकल्पापर्यंत हा टर्बाईन जाण्यासाठी २० दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
फताटेवाडी येथील एनटीपीसी प्रकल्पासाठीचा पाणी व कोळशावर चालणारा अजस्त्र टर्बाईन (स्टॉर्टर जनरेटर) कोरियाहून मागविण्यात आला आहे. अल्ट्रस इंडिया या कंपनीने हे टर्बाईन बसविण्याचे काम घेतले आहे. हे टर्बाईन भिवंडीजवळील बंदरात उतरविण्यात आले होते. टर्बाईन आणण्याची जबाबदारी कार्गो लॉजिस्टिक ट्रान्स्पोर्ट कंपनीने उचलली आहे. साडेआठशे टन क्षमता असलेले दोन वॉल्व्हो इंजिन कंटेनरला जोडले आहेत. २५० चाकी असलेल्या या कंटेनरवर वेगळे तंत्रज्ञान वापरून अजस्त्र लोखंडी सांगड्यात अलगद टर्बाईन ठेवण्यात आले आहे. यामुळे कंटेनरची लांबी वाढली आहे. भिवंडी येथील बंदरातून ४५ दिवसांपूर्वी या कंटेनरचा प्रवास सुरू झाला. वाटेत चढण आल्यास अडचण होऊ नये म्हणून एक जादा इंजिन सोबत ठेवण्यात आले आहे. ३ चालक, २० कर्मचारी व चार अभियंत्यांची टीम या कंटेनरसोबत आहे. बोगदे व पूल चुकविण्यासाठी मोठा मार्ग या टीमला पार करावा लागला. पुणे शहराबाहेरून नाशिक, मालेगाव, शिर्डी, अहमदनगर, करमाळा, टेंभुर्णी, सोलापूर असा टीमला प्रवास करावा लागला. दररोज दिवसा २५ ते ५० किलोमीटरचा प्रवास होता. वाटेत वीजवाहक तारा, कमानी, टोलनाके पास करताना टीमला कसरत करावी लागली. कंटेनरमध्ये काय आहे याची माहिती गोपनीय ठेवण्यात आली होती.
बुधवारी दुपारी हा कंटेनर जुना पुणे नाका येथे पोहोचला. बसवंती पार्किंगमध्ये तो थांबविण्यात आला आहे. आता आहेरवाडी येथील एनटीपीसी प्रकल्पस्थळी टर्बाईन पोहोच करण्याची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे लोखंडी सांगड्यातून टर्बाईन बाहेर काढून कंटेनरची रुंदी वाढविण्यात येणार आहे. यात दोन भागात असलेला कंटेनर जोडून, एक चाकाची लाईन वाढविण्यात येणार असल्याचे चालकाने सांगितले. हे काम करण्यासाठी आठवडा लागेल व त्यासाठी मोठे क्रेन लागणार आहेत.
-----------------------
१५ दिवस जागेचा शोध
या कंटेनरला थांबविण्यासाठी १५ दिवस जागेचा शोध सुरू होता. जुना पुणे नाक्याजवळ वीरभद्रेश बसवंती यांनी सुरू केलेल्या पार्किंगची जागा निवडण्यात आली. तशी त्यांना कल्पना देऊन बुधवारी दुपारी कंटेनर पोहचला. पुढील मार्गाची पाहणी टीमने केली. होटगी नाका चौकातील अडचण लक्षात घेऊन अक्कलकोट रस्ता, कुंभारी, सिद्धेश्वर साखर कारखानामार्गे नेण्याचे ठरविण्यात आले.

Web Title: NTPC's Turbine travels for 45 days in Solapur