टंचाई कालावधी वाढवून द्या

By Admin | Updated: July 2, 2014 00:45 IST2014-07-02T00:45:42+5:302014-07-02T00:45:42+5:30

जिल्हाधिकारी: शासनाकडे केली मागणी

Increase the scarcity period | टंचाई कालावधी वाढवून द्या

टंचाई कालावधी वाढवून द्या


सोलापूर: टंचाई कालावधीची मुदत ३० जूनपर्यंत असते; मात्र यंदा पाऊस लांबणीवर गेल्यामुळे टंचाई कालावधीची मुदत वाढवून देण्याची मागणी जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी शासनाकडे केली आहे़ हा कालावधी निश्चित वाढवून मिळेल असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला़
शासनाकडून ३० जून ही टंचाई निधी देण्याची अंतिम तारीख असते; मात्र जून महिना संपला तरीही पाऊस न पडल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत, चारा टंचाई, पाणीपुरवठा आदी कामांसाठी अतिरिक्त निधी लागणार असून त्यासाठी शासनाने टंचाई कालावधीची मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे़ सध्या बोरी, येवती तलावातील पाणी उपसा बंद करण्यात आला आहे़ तलावातील पाणी केवळ पिण्यासाठीच वापरावे असे नियोजन केले जात आहे़ पाणी उपसा बंदी करावी अशा सूचना तहसीलदारांना दिल्याचे गेडाम म्हणाले़
भीमा-सीना जोडकालव्यातून पाणी सोडण्याची मागणी सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांनी केली असून त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, उजनीतून पाणी सोडण्याचा अधिकार शासनाचा आहे़ शासन आदेश आल्याशिवाय आपण काही करु शकत नाही़
-------------------------
आषाढीसाठी पाणीटंचाई नाही
आषाढीवारीसाठी पंढरीत पाणीटंचाई भासणार नाही़ उजनी धरणातून १ टीएमसी पाणी वारीसाठी सोडण्यात येणार असून ते २ जुलै रोजी सोडले जाण्याची शक्यता आहे़ पंढरीत शौचालये बांधण्याचे काम देखील प्रगतीपथावर असून २५०० शौचालये तयार झाली आहेत़ ४००० शौचालये उपलब्ध केली जात आहेत़ शौचालय, पाणीपुरवठा, कचरा उचलणे तसेच अतिक्रमण या चार प्रमुख बाबींसाठी प्रत्येक एका मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक केल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले़ पालखी मार्गावर ७० पाणी टँकर दिले आहेत़
-----------------------------------------
स्वच्छतेवर भर
पालखी तळासाठी २़२० कोटींचा निधी
आषाढीवारीसाठी यंत्रणा सज्ज
५००० पोलीस, ३५० सफाई कर्मचारी, २०० डॉक्टर
पंढरीत एसटीच्या पत्राशेडसाठी ३५ लाख
पंढरीत यंदा स्वच्छतेवर भर

Web Title: Increase the scarcity period