आषाढीसाठी शासकीय यंत्रणा हायटेक

By Admin | Updated: June 25, 2014 01:49 IST2014-06-25T01:49:29+5:302014-06-25T01:49:29+5:30

प्रथमच होणार वॉकीटॉकीचा वापर

HiTech Government System for Aadhaar | आषाढीसाठी शासकीय यंत्रणा हायटेक

आषाढीसाठी शासकीय यंत्रणा हायटेक


जगन्नाथ हुक्केरी ल्ल पंढरपूर
आराध्य दैवत असणाऱ्या कानड्या विठुरायाची आषाढी यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पंढरपूर तालुक्यात पालख्यांनी प्रवेश केल्यानंतर कोणतीही अडचण भासू नये, यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. तर यावर्षी प्रथमच पंचायत समितीची यंत्रणा हायटेक करण्यात आली असून, वॉकीटॉकीच्या माध्यमातून भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत.
आषाढी यात्रेसाठी दहा ते बारा लाख भाविक पंढरीत दाखल होतात. याचबरोबर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्थानिक नागरिक पालखीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. यामुळे मोबाईल नेटवर्क बंद पडत असल्याने संपर्क तुटतो. यामुळे यावर्षी दहा वॉकीटॉकीच्या मदतीने पालखी मुक्कामाच्या ठिकाणी भाविकांना पाणी, वीज, औषधोपचार या सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी सांगितले.
सध्या पालखीबरोबर पिण्याच्या पाण्याचे ६५ शासकीय तर ४०० दिंड्यांचे टॅँकर आहेत. यासाठी सात ठिकाणी टॅँकर भरण्याची सोय केली आहे. याचबरोबर टॅँकरसोबत स्थानिक कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे, तर ८०३ पाण्याचे स्रोत राखीव ठेवले आहेत. याचबरोबर कॅनॉलला पाणी सोडण्याबाबत नीरा उजवा कालवा विभागाला पत्रव्यवहार केला आहे. पालखी तळावर टॅँकर उभे करण्याच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
तालुक्यात १७ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ६६ लाखांची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यात यात्रा कालावधीत २६ औषधोपचार केंदे्र स्थापन करण्यात येणार आहेत. यात प्रत्येक केंद्रात एक वैद्यकीय अधिकारी, दोन आरोग्य सेविका, एक शिपाई नियुक्त करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला काटेरी झुडपे तोडून स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
--------------------------
जादा कर्मचारी नेमणार
यात्रा कालावधीत भाविकांना कोणतीही अडचण भासू नये म्हणून पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करणार आहेत. याचबरोबर ६१ वैद्यकीय अधिकारी, ९१ आरोग्य सेविका, ७१ शिपाई, २० वाहनचालक आदी जादा कर्मचारी नेमण्यात येणार आहेत.
निधी मिळाला परंतु...
आषाढी यात्रेसाठी दरवर्षी शासनाकडून निधी मिळतो परंतु या निधीतून मजूर संस्था व सुशिक्षित बेकार अभियंत्यांना कामे दिली जातात. यंदा प्रथमच सीईओ चंद्रकांत गुडेवार यांनी ग्रामपंचायतींना कामे देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी ग्रामपंचायतींना कामाचे जि. प. मध्ये वाटपही झाले आहे.

Web Title: HiTech Government System for Aadhaar