जनगणना २०२७: सोलापूरकरांसाठी मोठी संधी; आता घरबसल्या करा स्वतःची ‘स्व-गणना’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 01:20 IST2026-04-30T01:20:07+5:302026-04-30T01:20:44+5:30
सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने या 'स्व-गणना' सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

प्रतिकात्मक फोटो...
सोलापूर: भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत जनगणना विभागाने 'जनगणना २०२७' अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्यासाठी एक अभिनव पाऊल उचलले आहे. आता नागरिकांना प्रगणकाची वाट न पाहता, स्वतःहून आपल्या कुटुंबाची माहिती डिजिटल पोर्टलवर नोंदवता येणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने या 'स्व-गणना' सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
१ मे ते १५ मे दरम्यान संधी आगामी जनगणनेसाठी ही स्व-गणनेची सुविधा १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत उपलब्ध राहणार आहे. नागरिकांनी https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपला मोबाईल क्रमांक वापरून ओटीपी द्वारे लॉगिन करणे आवश्यक आहे. त्यानंतर नकाशावर आपल्या घराचे अचूक स्थान दर्शवून कौटुंबिक माहिती भरता येईल. संकेतस्थळावर अत्यंत साध्या आणि सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. माहिती भरून सबमिट केल्यानंतर नागरिकांना एक (युनिक क्रमांक) प्राप्त होईल. हा क्रमांक घरी येणाऱ्या संबंधित प्रगणक कर्मचाऱ्याला देणे अनिवार्य आहे. प्रगणकाची वाट पाहण्याची गरज नाही, घरबसल्या केव्हाही नोंदणी करता येईल. स्वतः माहिती भरल्यामुळे चुकीची माहिती नोंदवली जाण्याची शक्यता कमी होईल. नागरिकांनी दिलेली माहिती अत्यंत गोपनीय ठेवली जाणार असल्याचेही महापालिकेने सांगितले.
मुख्याध्यापक आणि प्राचार्यांवर मोठी जबाबदारी -
सोलापूर महानगरपालिकेने शाळा, महाविद्यालये, शासकीय संस्था आणि स्वयंसेवी संस्थांना या राष्ट्रीय कार्यात सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये जनजागृती करून त्यांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
जनगणना ही केवळ आकडेवारी नसून देशाच्या भविष्यातील विकासाच्या योजनांचा पाया आहे. सोलापूरच्या सर्व नागरिकांनी या आधुनिक सुविधेचा जास्तीत जास्त वापर करून एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे.
- डॉ. सचिन ओंम्बासे, मनपा आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी